scorecardresearch

“मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका,” प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “महाविकास आघाडीला…”

वंचित बहूजन आघाडीचे सर्वोसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

prakash ambedkar and sanjay raut
प्रकाश आंबेडकर, संजय शिरसाट, शरद पवार (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वंचित बहूजन आघाडीचे सर्वोसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील महाविकास आघाडीला तडा जाईल, असे वक्तव्य कोणी करू नये असे आवाहन केले. राऊतांच्या या आवाहनानंतर हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मी विचार केला असता, असे प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. प्रकाश आंबेडकरांच्या याच विधानावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा सल्ला मानावा असे मी म्हणालोच नाही. त्यांनी महाविकास आघाडीला तडा जाईल अशी विधाने करू नये, असे माझे म्हणणे आहे; असे राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >> “शरद पवार आजही भाजपाबरोबर”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “अजित पवारांनी…”

शरद पवार यांचा सहभाग आणि नेतृत्व महत्त्वाचे

“माझा सल्ला माना असे मी कुठे म्हटलो आहे. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम होता. मी वंचित बहुजन आघाडी तसेच शिवसेनेच्या युतीबाबत बोललो नाही. मी महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहे. देशपातळीवर भाजपाच्या विरोधात आघाडी उभी करायची असेल, तर त्यात शरद पवार यांचा सहभाग आणि नेतृत्व महत्त्वाचे आहे असे मी म्हणतोय,” असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

हेही वाचा >> मुंबईत रामदास आठवले की प्रकाश आंबेडकर कोणाची अधिक ताकद ?

परिस्थिती प्रकाश आंबेडकर यांना माहिती आहे

“भाजपाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर ही मक्तेदारी कोणा एकाची नाही. आम्हाला प्रकाश आंबेडकर हवे आहेत, ममता बॅनर्जी, मायावती हव्या आहेत. जे येतील ते सगळेच हवे आहेत. मात्र महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती प्रकाश आंबेडकर यांना माहिती आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी आम्ही महाविकास आघाडीच्या रुपात एक बळ उभे केले. या आघाडीला तडा जाऊ नये अशी माझी भूमिका आहे,” असेही संजय राऊत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 19:32 IST