महाविकास आघाडीचे २५ आमदार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळवडीच्या दिवशी केला होता. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुमचेचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहे असे प्रत्युत्तर दिले आहे.

“लोक धुळवडीला भांग पितात अशी परंपरा आहे. पण रावसाहेब दानवे भांग पितात अशी माहिती माझ्याकडे नाही. रावसाहेब दानवे भांग पित नाहीत आणि ते दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना कुठलीही नशा करण्याची आवश्यकता पडलेली नाही. तरीपण ते असे धुळवडीला कोणत्या नशेमध्ये बोलले मला माहिती नाही. ते २५ बोलले आहेत पण त्यांना महाविकास आघाडीचे १७५ आमदार आमच्या संपर्कात आहे म्हणायचे असेल. त्यांची जीभ घसरली असेल. असे असेल तर मग आमदार घ्या आणि कोणासाठी थांबला आहात. तुमचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत असे म्हटले तर तुम्ही काय म्हणणार आहात?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

“पण आता होळी संपल्याने रात्री नशा उतरली असेल. काल आपण काय बोललो ते त्यांना आठवणार नाही,” असा टोलाही संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते दानवे?

महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

शिवसेनेने हिरवं पांघरून घेतलंय – रावसाहेब दानवे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या दिवशी शिवसेनेनं आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरवं पांघरून घेतलंय आणि ते हिरव्याचं समर्थन करतात. फक्त उरलेली इज्जत वाचवण्यासाठी सध्या ते भगवा-भगवा करत असतात. त्यामुळे भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांनी तपासून पाहावं. भेसळ एकट्याची होत नसते, तर दोन-तीन एकत्र आले की ती भेसळ होत असते,” असेही रावसाहेब दानवे म्हणाले.