ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच त्यांना कर्नाटकमधील कन्नड वेदिका या संघटनेकडून महाराष्ट्रात येऊन हल्ला करण्याची धमकी आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तसेच यावर भाजपा काही बोलणार आहे की थंडपणे पाहणार आहे? असा सवाल केला. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. हा माझ्यावरील हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरील हल्ला असेल. यावर भाजपा काही बोलणार आहे का की थंडपणे पाहणार आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात यावर भाजपाने बोलावं.”

“आम्ही कोणासाठी भांडत आहोत?”

“राजकारण बाजूला ठेऊ. आम्ही कोणासाठी भांडत आहोत? आम्ही राज्यासाठी भांडत आहोत. यांना दोन शब्द वापरले तर त्यांचा तिळपापड होतो. त्यांनी कृती करून दाखवावी. ते सत्तेवर आहेत. भाजपा नेते बेळगावात गेले नाहीत किंवा जाणार आहात की नाही याच्याशी आम्हाला संबंध जोडायचा नाही, मात्र ते जाऊ शकत होते,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“भाजपा नेत्यांच्या मनगटात खरंच महाराष्ट्राचं रक्त असतं, तर त्यांनी…”

“कर्नाटकचे लोक जतमध्ये घुसतात, मुंबईत घुसतात आणि हे थंडपणे सर्व पाहत आहेत, मग आम्ही कोणत्या शब्दाने भाजपाचं कौतुक करायचं? ते माझी पत्रकार परिषद होऊ देणार नाही म्हणतात. भाजपा आणि शिंदे गटाचे नेते आज जी भाषा बोलत आहेत ती कन्नड वेदिकावाल्यांचीच आहे. जर यांच्या मनगटात खरंच महाराष्ट्राचं रक्त असतं, तर त्यांनी या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला असता,” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर सडकून टीका केली.

हेही वाचा : “दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं…”, भाजपा आणि आपबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझी पत्रकार परिषद होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली. मात्र, माझी पत्रकार परिषद सुरू आहे. भडकावण्याची भाषा कोण करत आहे? देशात आणि महाराष्ट्रात शिवसेनेने कधीही कोणाला भडकावलेलं नाही,” असंही राऊतांनी नमूद केलं.