१६ आमदार अपात्रप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्याची मागणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशी चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढले होते. तसंच, मंगळवारपर्यंत सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आज सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी होणार असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे.

“हे चोर आणि लफंग्यांचं सरकार चालवत आहेत. आणि त्या चोर आणि लंफग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशामध्ये आणि राज्यामध्ये काय चाललंय याची कल्पना न केलेली बरी. वारंवार राहुल नार्वेकर विधिमंडळाचे अधिकार, विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाविषयी सांगत आहेत. याचा अर्थ असा नाही की चोरी करून एका घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकाने चोराला आणि खुन्यांना संरक्षण द्यावं, अशी या सार्वभौमात्वाची व्याख्या होत नाही”, अशी टीका संजय राऊतांनी केली. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >> Supreme Court Hearing: आमदार अपात्रतेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, विधानसभा अध्यक्ष सुधारित वेळापत्रक सादर करणार का?

“मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ४० आमदार आणि राष्ट्रवादीचे तेवढेच आमदार अजित पवारांसह बेकायदेशीरपणे मूळ घरांची लूट आणि चोऱ्या करून दुसऱ्या घरात शिरले आहेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाचं नाव देऊन संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकरांचं नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून देशाच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. भगतसिंह कोश्यारीनंतर राहुल नार्वेकरांचं नाव घेतलं जाईल. ते जेव्हा खुर्चीवर नसतील तेव्हा अशा लोकांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल. या राज्याची जनता माफ करणार नाही”, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी यावेळी केला.

“तुम्हाला निर्णय घ्यायचाय ना. त्यांना फासावर लटकायचे आदेश सर्वोच्च न्यायालयातून आले आहेत. हे लोकशाहीचे हत्यारे आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मर्यादेनुसार त्यांना बरखास्त करण्याचं काम विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे दिलं आहे”, असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “संघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी…”, ठाकरे गटाचे सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर, म्हणाले “नमकहरामीचे टोक…”

घटनात्मकरित्या फासावर लटकाववंच लागेल

“सर्वोच्च न्यायालय एखाद्या खुन्याला, हत्याराला फाशीची शिक्षा सुनावते. पण फासावर लटकवण्यासाठी एखाद्या जल्लादाची गरज असते. न्यायमूर्ती त्यांना फासावर लटकवत नाही. त्या जल्लादाचं काम करण्याचे अधिकार विधिमंडळांच्या अध्यक्षांचे आहे. तुम्हाला ८० आमदारांना (शिंदे गट ४० आमदार आणि अजित पवार गट ४० आमदार) घटनात्मकरित्या फासावर लटकवावंच लागेल. तुम्ही कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी या आमदारांची सुटका नाही, मिस्टर नार्वेकर”, असा इशाराही त्यांनी दिला.

नार्वेकरांचं वेळापत्रक ही लफंगेगिरी

“नार्वेकरांचं वेळापत्रक ही लफंगेगिरी आहे. नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात हे त्यांनी ठरवावं”, असंही ते म्हणाले. या महाराष्ट्राला चोरांच्या सरदारांची गरज नाही. या महाराष्ट्राला संविधानाच्या रखवालदारांची गरज आहे. चौकीदार चोर आहे, तर संविधानपिठावर बसलेले चोर आहेत”, असं म्हणण्याची वेळ या महाराष्ट्रावर येऊ नये”, असं राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि आधीच्या राज्यपालांनी न्यायालयाचा इतक्या वेळा अपमान केला आहे की, न्यायालयाने यांना रोज फासावर लटकावलं पाहिजे”,असंही राऊत म्हणाले.