सध्या संपूर्ण देशभर राममय वातावरण निर्माण झालं आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याने अनेकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. परंतु, देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना अयोध्येत मान-पान मिळणार नसल्याने ठाकरे गटाने मूर्मू यांना नाशिकला बोलावले आहे. यावरून दादा भुसे यांनी संजय राऊतांवर टीका केली.
“जनतेत संभ्रम निर्माण करण्याकरता संजय राऊत रोज नव्या संकल्पना शोधून काढतात. यामुळे जनतेची दिशाभूल होते. केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले चांगले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी समाजातील सर्व घटकासाठी होते. परंतु, त्यापासून लोकांना विचलित करण्याकरता संजय राऊत अशा संकल्पना शोधून काढतात”, अशी टीका दादा भुसे यांनी केली.
“५५० वर्षांपासून भारतीयांचे स्वप्न होतं की अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर व्हावे, हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे देखील स्वप्न होते. ते स्वप्न आता साकार होते आहे. प्राणप्रतिष्ठा मोदींच्या हस्ते होते आहे, याचा नक्कीच आनंद आहे. नाशिकच नाही तर जगाच्या पाठीवर भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहेत”, असंही दादा भुसे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे उद्या (२२ जानेवारी) काळाराम मंदिरात जाणार आहेत. तिथे ते जाहीर सभा घेणार आहेत. या सभेवरून दादा भुसे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत ज्याला त्याला त्याच्या पक्षाचे काम करण्याचे अधिकार आहेत.