Sanjay Raut Health Update: शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या पांढऱ्या पेशी मंगळवारी अचानक कमी झाल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल माहिती त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एक्सवर एक पत्र पोस्ट करत प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. काही महिने आपण सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडिवायवर पोस्ट केलेला फोटो चर्चेत आहे.

मागील काही काळापासून संजय राऊत यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये अधूनमधून त्यांना तपासणीसाठी नेण्यात येत होते. मात्र मंगळवारी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तपासणीदरम्यान त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सध्या संजय राऊत यांची प्रकृती ठीक असून त्यांना पुढील पाच दिवस रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांची पोस्ट काय?

विरोधकांवर रोज तुटून पडणारे संजय राऊत रुग्णालयातही स्वस्थ बसलेले नाहीत. तिथेही त्यांनी रोज लिहिण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. हाताला सलाइन लावलेले असतानाही त्यानी पानभर लेख लिहिल्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

या फोटोत त्यांच्या हाताला सलाइनची सुई लावलेली दिसत आहे. त्याच हाताने त्यांनी पानभर लेख लिहिला आहे. सामना दैनिकासाठी त्यांनी लेख लिहिला असल्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांनी रुग्णालयातून लेख लिहिल्याचे सांगितले होते. या फोटोला त्यांनी कॅप्शनही दिले आहे. ते म्हणाले, “हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहिल त्याचे वृत्तपत्र, आमच्या पिढीचा मंत्र होता!”

दरम्यान या पोस्टखाली त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करणाऱ्या कमेंट टाकल्या जात आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आराम करण्याचे आवाहन केले. तसेच ते लवकर बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.