सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतच वेगवेगळ्या पक्षांच्या, नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली. यावर संजय राऊत म्हणाले की, “अजितदादा असं काही करतील असं मला वाटत नाही.”
संजय राऊत म्हणाले की, अंजली दमानिया यांना भाजपाकडून ही माहिती मिळाली असेल तर त्यांनी ती जाहीर केली असेल. पण अजितदादा असं काही करतील असं मला तरी वाटत नाही. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. तसेच ते स्वाभिमानी आहेत, त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. अजित पवार हे बाणेदार असं नेतृत्व आहे ते जाऊन मिंध्याप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही.
संजय राऊत म्हणाले, शेवटी प्रत्येकजण व्यक्तिगत काही निर्णय घेत असतात. परंतु मी अजित पवारांना जितकं ओळखतो, अलिकडे जे काही पाहिलंय त्यावरून सांगेन की, अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करतील, असं मला वाटत नाही.
हे ही वाचा >> “मी अण्णा हजारेंची हत्या करणार!”, शेतकऱ्याची शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, “१ मे…”
काय म्हणाले अजित पवार?
दरम्यान, अंजली दमानियांच्या दाव्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे.”