Sanjay Raut On mns chief Raj Thackeray meet Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही नेते मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने दोन्ही नेते मातोश्रीवर एकत्र आले. आज राज ठाकरेंनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीत काय चर्चा झाली याबद्दल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?
ठाकरे बंधूंच्या भेटीत काय-काय घडलं? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, “बरंच काही घडलं, दोन भाऊ भेटले. एकमेकांना प्रेमाचं अलिंगन दिलं. गप्पा झाल्या. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत व्यंगचित्रांवर चर्चा झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच गोष्टी झाल्या. दोन भाऊ भेटले. दोन नेते भेटले नाहीत.” संजय राऊत हे टीव्ही९च्या प्रतिनिधीशी बोलत होते.
“दोन भाऊ आहेत, ते भेटणं गरजेचं होतं, ते भेटले. नातं दृढ होतंय. याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे,” असेही संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले. युतीबाबतच्या प्रश्नावर मात्र राऊतांनी “जे होईल ते चांगलंच होईल” इतकंच उत्तर दिलं.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास २० मिनिटांपेक्षा जास्त चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे.
जवळपास दहा वर्षांनंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अगदी दोन शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. “आज मला खूप आनंद झाला आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, या भेटीवेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह आदी नेतेही उपस्थित होते.