वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची युती झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. एकीकडे यामुळे ठाकरे गटाला प्रकाश आंबेडकरांची मदत होईल असं मानलं जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत त्यांच्या समावेशावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. काँग्रेस व राष्ट्रवादीशी असणारे प्रकाश आंबेडकरांचे वाद सर्वश्रुत असताना आता या तिघांमध्ये एकमक घडवून आणण्याची जबाबदारी आपसूकच उद्धव ठाकरेंवर येऊन पडली आहे. या पार्श्वभूमीवर वंचितच्या मविआमधील समावेशाबाबत ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केला जावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या होताना दिसत आहेत. शरद पवार यांच्याशी प्रकाश आंबेडकरांची चर्चा झाली असून उद्धव ठाकरेंनीही त्यांच्याशी महाविकास आघाडीमधील समावेशाबाबत बोलणी केली. मात्र, काँग्रेसकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून त्यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केलेलं विधान चर्चेत आणखीन भर घालणारं ठरलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

आज सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांच्या समावेशासंदर्भात भाष्य केलं. “शिवसेना हा मविआमधला प्रमुख घटक पक्ष आहे. आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे. त्यामुळे आम्ही असं मानतो की वंचितही मविआची घटक आहे. लोकसभेच्या दृष्टीने सध्या चर्चा चालू आहे. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानाने मविआमध्ये सहभागी करण्यासंदर्भात आत्तापर्यंत किमान ६ ते ७ वेळा सकारात्मक चर्चा झाली आहे”, असं संजय राऊतांनी नमूद केलं.

गळ्यातील पट्ट्यावरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; प्रत्युत्तरात संजय राऊत म्हणाले, “त्यांना २०२४ नंतर…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्वत: प्रकाश आंबेडकर व शरद पवारांनी चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांचीही चर्चा झाली आहे. काही निर्णय झाले आहेत. महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची जनता कोणत्याही स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही. प्रकाश आंबेडकरांचाही हाच ठाम विचार आहे. देशात संविधानाचं, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचं संरक्षण व्हायला पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले.

अकोल्यातून प्रकाश आंबेडकरच?

दरम्यान, अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. “अकोल्याची जागा परंपरेनं प्रकाश आंबेडकरच लढतात. त्यांनीच ती लढावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. याशिवाय वंचितचे उमेदवार कुठे उभे करता येतील, यावर चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे”, असे सूतोवाच संजय राऊतांनी यावेळी केले.