शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सत्ताधाऱ्यांवर टीका करणं असो, त्यांच्यावर आरोप करणं असो, अथवा स्वतःवरील टीकेला उत्तर देणं असो संजय राऊत सातत्याने वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. बऱ्याचदा ते सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु अशाच एका पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य त्यांना आता भोवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका असं आवाहन संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यामुळे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम ५०५ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याचदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. या निकालावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, हे सरकार बेकायदेशीर आहे, लवकरच हे सरकार जाणार आहे, त्यामुळे सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील त्यांनी या बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नये.

हे ही वाचा >> “पहाटेचा शपथविधी योग्यच होता, कारण…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

या पत्रकार परिषदेत राऊत यांनी जे आवाहन केलं होतं, तसेच जे आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्ही ९ मराठीने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं आहे की, वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत आहेत. यासंबंधीची पुढील कारवाई आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.