“अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल”, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आज त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी औरंगजेब लागतोय हे तुमच्या तथाकथित हिंदुत्त्वाचं दुर्दैव आहे”, असं संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “तुमचे गृहखातं फेल आहे. आम्हीही या महाराष्ट्रावर राज्य केलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती आहे, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही सांगूनही तुम्ही काही करत नाही. कायदा आणि पोलीस यंत्रणा त्रास देण्याकरता वापरत आहात. तुम्ही गुंडांच्या मुसक्या बांधत नाही आहात, तुम्ही अत्याचारी लोकांना वाचवण्याकरता यंत्रणा वापरत आहात. बाकी तुम्ही काय करताय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोगलाई ही वृत्ती

“अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. हे कोण करीत आहे तपासून बघावे लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल”, असा इशारा काल (७ जून) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यावरून संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात अशाप्रकारच्या ऑन एअर धमक्या दिल्या नव्हत्या. औरंगे तुम्ही तुमच्या अवती भोवती पोसताय. मोगलाई दुसरी काय होती? हीच मोगलाई होती. मोगलाई फक्त खान, सलीम, अब्दुल, अकबर नाही. मोगलाई ही वृत्ती आहे. विकृती आहे. हिंमत असेल तर ऑन एअर धमक्या दिल्या त्यांच्यावर कारवाई करा. तरच सांगा तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात म्हणून. विरोधकांच्या बाबतीत आधी फाशी मग चौकशी. आणि स्वतःच्या बाबतीत चौकशी नाही, तक्रार नाही, एफआयआर नाही, गुंडागुंडांचं खुल्ल समर्थन ही राज्याची स्थिती आहे. तुम्ही स्वतःलाचा प्रश्न विचारा की मी या राज्याचा गृहमंत्री आहात का.”

नार्वेकरांवर विश्वासन नाही, खूर्चीवर विश्वास

“आमचा विधानसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. आमचा व्यक्तीला विरोध असू शकतो. पण ते घटनात्मक पद आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना असलेले अधिकार यावरूनच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. . सर्वोच्च न्यायालाय्चाय निर्यणाबाबहेर जाता येणार आहे. त्यांच्या मनात घटनाबाह्य असेल तर आणि काही घडलं तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे येणाऱ्या काळात कळेल”, असंही संजय राऊत म्हणाले.

निवडणूक आयोगावर विश्वास नाही

“निवडणूक आयोगावर विश्वास नाही. बाळासाहेबांची शिवसेना फुटीरगटाच्या हातात देण्यात आली. हा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला. विधीमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण आहे. तरीही निवडणूक आयोगाने राजकीय दबावाखाली निर्णय दिला त्यानुसार ही संस्था विकली गेली आहे”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on dcm devendra fadnavis over aurangabad awaladi statement sgk
First published on: 08-06-2023 at 10:05 IST