Sanjay Raut on Raj Thackeray: शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हे एकत्र येण्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. राजकारण दोन पक्ष एकत्र येणे सामान्य बाब असली तरी या पक्षाचे पक्षप्रमुख चुलत भाऊ आहेत. या दोन्ही नेत्यांकडे मराठी माणसाचे कायमच लक्ष लागलेले असते. तसेच त्यांची विधानं राजकारणात चर्चेचा विषय ठरत असतात. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत युतीसाठी साद दिली होती, त्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला होता. आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी यावर मोठं विधान केलं आहे. पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. पडद्याच्या नाड्या ठाकरे भावांच्या हातात आहेत, ते योग्य वेळी पडदा वर करतील, असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणूक, महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्ही युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलाखतीमध्ये कोणता नेता काय बोलतो? यावरून युतीची चर्चा ठरत नाही.
“उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाबरोबर नातं जोडायला सकारात्मक भूमिका ठेवली आहेत. मराठी माणसाचे अहित होता कामा नये, ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना, इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण मागे हटता कामा नये”, असे संजय राऊत म्हणाले.
“मराठी माणसाचा दोन्ही नेत्यांवर (ठाकरे बंधू) भावनिक आणि राजकीय दबाव आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला हक्क कायम ठेवायचा असेल आणि सूरत या ईस्ट इंडिया कंपनीच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावे लागेल. मराठी माणसाला ताठ मानेने जगायचे असेल तर सर्व जळमटे दूर ठेवून, मतभेद विसरून एकत्र यावे लागेल. ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे मन अतिशय मोठं आणि विशाल आहे. आमची यासंदर्भात कालही चर्चा झाली असून आपण सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. किंबहुना हीच बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल.”
ठाकरे-पवार ब्रँड संपणार नाही
मुंबई तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील ठाकरे आणि पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न होत आहे. पण हा ब्रँड संपणार नाही. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दिल्लीतून हा ब्रँड संपविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जोपर्यंत ठाकरे आणि पवार संपत नाहीत, तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाहीत, हे दिल्लीतील लोकांना माहीत आहे. त्यासाठी ठाकरे-पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न होत आहे.