पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या सदरात ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊत यांचा लेख छापून आला होता. या लेखाची आता ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाची परवानगी असल्याशिवाय राऊत कोठडीतून लेख लिहू शकत नाहीत. राऊतांनी अशाप्रकारची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने या संदर्भात बातमी प्रकाशित केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा राऊत यांनी ‘रोखठोक’मधून समाचार घेतला होता.

राऊतांनी रोखठोकमध्ये काय म्हटलं होतं?

 “राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे,” असं संजय राऊत लेखात म्हणाले होते.

शिवसेनेकडून काँग्रेसचं तोंड भरुन कौतुक; अमित शाहांना ‘त्या’ वक्तव्यावरुन केलं लक्ष्य तर गांधी कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाले…

“कोश्यारी यांनी त्यांच्या एका भाषणात काय सांगितले? ‘‘गुजराती व मारवाडी लोक मुंबईत आहेत म्हणून मुंबईस आर्थिक राजधानीचा दर्जा आहे. गुजराती-मारवाडी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही.’’ राज्यपालांचे हे विधान निर्हेतुक कसे असेल? मुंबईतील गुजराती-मारवाडी समाजाच्या लोकांनाही श्री. कोश्यारी यांचे विधान आवडले नाही व त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा करताच ज्यांचे पित्त खवळले, त्यांनी महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या अपमानाबद्दल साधा निषेध केला नाही. हासुद्धा महाराष्ट्राचा अपमानच आहे,” असा संताप संजय राऊतांनी या लेखातून व्यक्त केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. पत्राचाळीसह अलिबागमधील जमिनीचे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केला आहे. त्यांनी याबाबत सेशन्स कोर्टात कागदपत्रेही सादर केली आहेत. वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशीही ईडीकडून करण्यात येत आहे.