Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं असून उपचारांसाठी ते छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहेत. दरम्यान याबाबत आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुंबईत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठी बांधवांनी आंदोलन केलं. आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या मागण्या होत्या. पावसात आणि चिखलात ते आंदोलन करत होते. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. जर आंदोलक आणि मनोज जरांगे समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत. मुंबईत गुलाल उधळून त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे समाधानी आहेत आम्हीही समाधानी आहोत. मराठा समाजाच्या वेदना, क्लेश सरकारने संपवलं असेल तर आम्हीही सरकारचं अभिनंदन करु असं संजय राऊत म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले ते योग्य आहे की पूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत कुणीही आकांडतांडव करु नये. ओबीसी असो की मराठा सगळे महाराष्ट्रातलेच बांधव आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट आहे. जातीपातीच्या मुद्द्यावर कुणीही भेदाभेद करु नये. मराठी माणसाची एकजूट असलीच पाहिजे असं बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं. आम्ही त्याच विचारांवर चालणारे आहोत असंही राऊत म्हणाले.

भाजपाचे नेते अजूनही मनोज जरांगेंची कुचेष्टाच करत आहेत-संजय राऊत

भाजपाचे काही नेते अजूनही मनोज जरांगेंची कुचेष्टाच करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कसं जरांगेंना बाहेर काढलं. अध्यादेश पूर्णपणे अभ्यासून त्यावर बोलता येईल. मनोज जरांगे समाधानी आहेत तर आम्हीही समाधानी आहोत. उपोषणामुळे मनोज जरांगेंना वेदना झाल्या, त्यांचा प्राण पणाला लागला होता. त्यामुळे त्यांना न्याय देणं आवश्यक होतं. भाजपा हा दुतोंड्या गांडुळासारखा पक्ष आहे. मनोज जरांगे मुंबईत आले तेव्हा टोकाचा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाच्या लोकांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या स्थितीत संयम दाखवला. त्यामुळे मी फडणवीस यांचं कौतुक करतो असंही संजय राऊत म्हणाले. कालच्या आंदोलनात एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते? असाही सवाल संजय राउत यांनी केला. आठ पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या. सरकारने जो जीआर काढला कारण त्यांच्यापुढे काही पर्याय शिल्लक नव्हता. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आंदोलनाची कोंडी फुटणं आवश्यक होतं, त्यामुळे त्यांनी हा जीआर काढला गेला असंही राऊत म्हणाले.

मनोज जरांगेंच्या लढ्याला यश

मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी केली होती. यासह, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाच्यावतीने आज मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच, सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे.