कर्नाटकमधल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच स्थानिक राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू होईल, तसेच राज्यात दंगली होण्याची भीती असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेरडल येथील सभेत व्यक्त केलं आहे. त्यामुळे राजकीय स्थैर्यासाठी भाजपला साथ देण्याचं आवाहन शाह यांनी केलं आहे.
अमित शाहांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. राऊत म्हणाले की, देशाचे पंतप्रधानही कानडी वेशभूषा करून कर्नाटकात फिरतायत, पण त्याचा त्यांना किंवा भाजपाला काहीही फायदा होणार नाही. दुसऱ्या बाजूला कर्नाटकात काँग्रेस जिंकल्यास दंगली होतील हे देशाचे गृहमंत्री सांगतात, हे खूप धक्कादायक आहे. शाह लोकांना धमकी देतायत का, आम्हाला मतं द्या नाहीतर दंगली होतील.
संजय राऊत म्हणाले की, ही अमित शाह यांची धमकी आहे. मुळात ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलायला हवं. तसेच भाजपाशासित राज्यात ज्या दंगली सुरू आहेत त्यावर ते का बोलत नाहीत. पण कर्नाटक हरलो तर दंगली होतील, हे वक्तव्य देशाच्या गृहमंत्र्याला शोभत नाही. अशा धमक्या देणं त्यांना शोभत नाही. हे चांगल्या गृह मंत्र्याचं लक्षण नाही. दंगली होतील म्हणताय मग तुम्ही नेमकं काय करताय?
हे ही वाचा >> विखे पाटलांच्या मुख्यमंत्रिपदावरून अब्दुल सत्तारांचं वक्तव्य, म्हणाले, “माझी छाती फाडून…”
खासदार राऊत म्हणाले की, पुलवामा हल्ला झाला तेव्हा तुम्ही शांत होता, किंबहुना तुम्ही तो हल्ला होऊ दिला हे आता स्पष्ट दिसतंय. दंगली होत असताना तुम्ही डोळे मिटणार आहात, कारण तुम्हाला लोकसभेचं राजकारण करायचं आहे, हे आता स्पष्ट आहे. तुमचं राजकारण हे दंगलींचं राजकारण आहे. तुमचं राजकारण हे स्फोटांचं आणि हत्यांचं आहे. हे आता उघड व्हायला लागलं आहे. त्यामुळे देशातल्या जनतेला आता डोळसपणे पुढची पावलं टाकावी लागतील.