Sanjay Raut on Devendra Fadnavis remark on Javed Miandad : आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बीसीसीआयला हा सामना खेळवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, यावरून विरोधी पक्ष केंद्र सरकार व पंतप्रधान मोदींना कोंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावरून टीका करताना म्हणाले “हे लोक आता आपला क्रिकेट संघ पाकिस्तानविरोधात खेळवणार आहेत. मग तुमचं गरम सिंदूर गेलं कुठे? तुम्ही घराघरात सिंदूर वाटणार होतात, त्याचं काय झालं? कशाला या भाकडकथा रंगवताय?” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जावेद मियाँदादला (पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू) घरी जेवायला बोलावणारे तुम्हीच होता ना? त्यामुळे एकदा आरसा बघा.” फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “फडणवीसांनी आरशाचं दुकान काढलंय का?”

“बाळासाहेबांनी मियाँदादच्या तोंडावर सांगितलं की…”

संजय राऊत म्हणाले, माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियाँदाद याला घेऊन अचानक ‘मातोश्री’वर (बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान) आले होते. ते बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करायला आले होते की त्यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना विरोध करू नये. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने पुन्हा सुरू व्हायला हवेत. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी मियाँदादच्या तोंडावर सांगितलं की दहशतवाद व क्रिकेट एकत्र चालणार नाही. जोपर्यंत पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये रक्तपात होत राहील तोवर भारतीय संघ पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार नाही.

“बाळासाहेबांनी जावेदला स्पष्ट शब्दात त्यांचा संदेश दिला. तुमच्या नरेंद्र मोदींसारखं शेपूट घातलं नाही. तुमच्या मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर, पाकिस्तान व चीनसमोर जसं शेपूट घातलं तसं बाळासाहेबांनी केलं नाही. त्यांनी सांगितलं की क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही. तुमचे मोदी देखील म्हणाले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. तरी देखील आता क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जावेद मियाँदादला त्याच्या तोंडावर सांगितलं होतं की चहा पी आणि इथून निघ. पाहुणा म्हणून आला आहेस, हा पाहुणचार घे आणि निघून जा.”

संजय राऊत म्हणाले, “तुम्हा प्रसारमाध्यमांना तपासून पाहायचं असेल तर तुम्ही जावेद मियाँदाद याच्याबरोबर आलेले भारतीय संघाचे कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना विचारू शकता. मातोश्रीवर नेमकं काय घडलं होतं हे वेंगसरकर तुम्हाला सांगतील.”