मणिपूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन महिन्यात कोणतीही कारवाई झाली नव्हती. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. तसेच मणिपूरमधील त्या महिलांबरोबर झालेला प्रकार कधीही माफ केला जाऊ शकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझं मन दुःख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरमध्ये घडलेली घटना कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत ते बाजूला ठेवा. परंतु, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली आहे. १४० कोटी देशवासीयांची मान शरमेने खाली गेली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याला खूप उशीर झाल्याचे सांगत विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, दोन महिन्यांनंतर पंतप्रधानांनी त्यावर वक्तव्य केलं. परंतु ते वक्तव्य संसदेच्या बाहेर येऊन केलं. याचा अर्थ तुम्ही संसदेला मानत नाही. मग नवी संसद कशाला उभी केली? संसदेत यावर बोलायचं नाही, मग लोकशाहीचा डंका कशाला पिटता?

खासदार राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले, संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात हे लक्षात ठेवा. मणिपूरचा विषय अत्यंत गंभीर आहे. या विषयावर युरोपियन संसदेत चर्चा होते, लंडनमध्ये चर्चा होते. परंतु, या विषयावर नरेंद्र मोदी आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. तब्बल ८० दिवसांनंतर नरेंद्र मोदींनी याप्रकरणी वक्तव्य केलं, तेही संसदेच्या बाहेर. त्याने काय होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार संजय राऊत म्हणाले, देशात एका ठिकाणी दोन महिलांची नग्न धिंड काढली जाते. हे आपल्या देशाचं चरित्र आहे का? तुम्ही समान नागरी कायद्याच्या गप्पा मारता आणि अशा गंभीर विषयावर ८० दिवस काही बोलत नाही. हे मगरीचे अश्रू आता बाहेर आले आहेत. खरंतर यावर संसदेत चर्चा व्हायला हवी.