प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे. परंतु, मविआतल्या या चार पक्षांमधील जागावाटपासंदर्भातील चर्चा पुढे सरकलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून चार पक्षांमधील नेत्यांच्या बैठका चालू आहेत. परंतु, जागावाटपावर त्यांचं एकमत झालेलं दिसत नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या. तसेच प्रकाश आंबेडकर यांनीदेखील त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत मात्र प्रसारमाध्यमांसमोर सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत होते. त्याचबरोबर जागावाटपाची चर्चा पुढे न सरकण्याचं कारण विचारल्यावर संजय राऊतांनी वंचितकडे बोट दाखवलं. त्यानंतर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले, “संजय राऊत माध्यमांना चुकीची माहिती देत आहेत.” यावरून महाविकास आघाडीत सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं. अशातच महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या चार जागा देऊ केल्या आहेत. संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घ्यायचा आहे, असंही राऊत म्हणाले.
लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज (१५ मार्च) संध्याकाळी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल या बैठकीला हजर राहणार आहेत. आजच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागा देऊ केल्या आहेत. तसा प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला आहे. त्यांनी राज्यातल्या २७ मतदारसंघात काम केल्याची माहिती आम्हाला दिली होती. या २७ जागांची यादी वंचितने मविआसमोर सादर केली होती. त्यापैकी चार जागांचा प्रस्ताव आम्ही वंचितसमोर ठेवला आहे. आता वंचितच्या नेत्यांनी त्या चार जागांबाबत निर्णय घ्यायचा आहे.
प्रकाश आंबेडकर संजय राऊतांबद्दल काय म्हणाले होते?
अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीतील जागावाटप अडल्याची चर्चा चुकीची असल्याचे सांगितले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि शिवसेनेत लोकसभेच्या दहा जागांवरून मतभेद आहेत. या दहा जागांवर कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही दावा केला आहे. दुसरीकडे, पाच जागांवरून कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात अजून एकमत झालेलं नाही. संजय राऊत हे माध्यमांशी खोटं बोलत आहेत. जेव्हा महाविकास आघाडीतील मतभेद संपुष्टात येतील, तेव्हाच वंचित बहुजन आघाडी चर्चा करू शकेल.