“शिंदेंच्या सभेला ३०० रुपयांत माणसं आणतात”, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले, “सभा सुरू झाल्यावर…”

मालेगावात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत मालेगावात ठाण मांडून बसले आहेत.

sanjay raut jalgon pc
उद्धव ठाकरेंच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, उद्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यासाठी ते दुपारी जळगावात दाखल होतील. शिवाय इतर कार्यक्रमांनाही ते हजेरी लावतील.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमावलं. ४० हून अधिक आमदार तसेच खासदार आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत. पक्षाच्या या पडझडीच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. अलिकडेच त्यांनी रत्नागिरीतल्या खेड येथे मोठी सभा घेतली. ही सभा यशस्वी झाली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा आज (२६ मार्च) रोजी मालेगाव येथे होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत, खासदार विनायक राऊतांसह पक्षातील अनेक नेते गेल्या दोन-तीन दिवसांपासून मालेगावात ठाण मांडून बसले आहेत. तसेच सभेची तयारी करत आहेत.

दरम्यान, या सभेपूर्वी आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत यावेळी म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातल्या सभेबद्दल देशभरातल्या राजकीय वर्थुळात चर्चा आणि उत्सुकता आहे. देशात सध्या सुरु असलेल्या घडामोडींबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही सभा रेकॉर्डब्रेक हा शब्दही कमी पडेल इतकी मोठी होईल.”

हे ही वाचा >> “पवारांची चावी कुठेही चालते”; गुलाबराव पाटलांचा टोला, म्हणाले, “त्यांनी उठोबा-बठोबा..”

“त्यांच्या सभेला ३०० रुपये रोजावर माणसं आणली जातात”

संजय राऊत म्हणाले की, “या सभेला कोणी भाड्याने माणसं आणणार नाही. तिकडे (शिंदे गट) सभेसाठी ३०० रुपये ते ५०० रुपये रोजावर माणसं आणली जातात. पण मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात. या लोकांना समोर कोण बोलत आहे याची माहिती नसते. उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. अनेक संस्थांनी यासाठी सुट्ट्या दिल्या आहेत, कामं थांबवली आहेत. लोकांना सभेला येता यावं लोकांना सुट्ट्या दिल्या आहेत. कारण ही सभा माहाराष्ट्राला दिशा देणारी असेल. शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार आणि महिलांसह सर्वांनी या सभेला यावं, उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकावे.”

संजय राऊत म्हणाले की, “माझ्या भाषेत मी म्हणेन, उद्धव ठाकरेंच्या या सभेमुळे लोकांची हातभर फाटली आहे. पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना रस्ता बदलण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरे रस्ता बदलणार नाहीत. आम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 11:24 IST
Next Story
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?
Exit mobile version