Sanjay Raut on Rahul Gandhi : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांना सोबत घ्यायचं की नाही यावर बोलताना काँग्रेसचे मुंबईतील प्रमुख नेते भाई जगताप म्हणाले, “ना उद्धव ठाकरे, ना राज ठाकरे, काँग्रेस मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवू शकते.” जगताप यांनी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाचे वरिष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्यासमोर मांडली. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीत स्वागत केलं आहे. यावर शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाई जगताप म्हणाले होते की “मुंबईत काँग्रेसचा महापौर बसेल.” यावर संजय राऊत म्हणाले, “आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता. परंतु नाही होऊ शकला. आम्ही काँग्रेसच्या नेत्याला पंतप्रधान करण्यासाठीच इंडिया आघाडीची निर्मिती केली होती. कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं होतं. तेव्हा आम्ही असं म्हणालो नाही की आम्हाला शिवसेनेचा किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे. आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे.”

“२७ महापालिकांमध्ये काँग्रेसचा महापौर बसवा, पण…”

संजय राऊत म्हणाले, “काँग्रेस दिल्लीत व देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे त्यात आमचं देखील मत फार मोठं आहे. आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे आणि तुम्ही मुंबईचा महापौर करण्याच्या गोष्टी करत बसला आहात. तुम्ही २७ महापालिकांच्या महापौरपदी काँग्रेसच्या नेत्याला बसवा. आमची काहीच हरकत नाही. आम्हाला केवळ भारतीय जनता पार्टीला रोखायचं आहे. त्यांच्या भ्रष्ट राजकारणासमोर आव्हान उभं करायचं आहे. आम्हाला आपल्या ऐक्याची ताकद निर्माण करायची आहे, ही आमची भूमिका आहे. मुंबईत मराठी महापौर होणं, मराठी मातीतला माणूस मुंबईच्या महापौरपदी बसवणं गरजेचं आहे.

“मागील ३० वर्षांपासून मुंबईत मराठी महापौर आहे. याचं श्रेय शिवसेनेला द्यावं लागेल. अनेकदा यामध्ये काँग्रेसचं देखील सहकार्य लाभलं आहे ही गोष्ट विसरता येणार नाही. त्यामुळे एखादा काँग्रेस नेता यावरून काही बोलत असेल तर त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. ते केवळ एक दिवसासाठी प्रसिद्धीसाठी केलेलं वक्तव्य असू शकतं. मला वाटतं की काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद नसतील, केवळ अंतर्गत वाद उफाळून आला असेल.”

दरम्यान, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेच्या युतीचे संकेत दिले आहेत.