मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील काही मालमत्तांवर ईडीनं जप्तीची कारवाई केल्यानंतर राज्यातलं राजकारण तापलं आहे. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून ईडीच्या गैरवापराचा आरोप केला जात असताना दुसरीकडे भाजपाच्या काही नेतेमंडळींवर देखील महाराष्ट्र पोलिसांनी कारवाईची तयारी सुरू केली आहे. यावरून सूडाचं राजकारण होत असल्याची टीका भाजपानं केली होती. त्यावरून आता संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…याचा अर्थ समजून जा”

शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत सध्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने नागपूरमध्ये असून तिथे माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विरोधी पक्षांवर टीका केली. “महाराष्ट्र आणि बंगालमध्ये राज्यपाल दोन्ही सरकारांवर निशाणा साधतात. इतरही राज्यांमध्ये राज्यपाल आहेत. ईडीची कार्यालये आहेत. पण ईडी आणि राज्यपाल जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथेच कारवाया करतात. याचा अर्थ समजून घ्या”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“..तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल”

“केंद्रीय तपास यंत्रणा सूडाच्या भावनेनं तपास करत आहेत. त्या पद्धतीने महाराष्ट्राचं गृहमंत्रालय कधीच करणार नाही. विरोध पक्षनेते कितीही बोंबलले की सूडाच्या कारवाया सुरू आहेत तरी राज्याच्या गृहमंत्रालयाला एक परंपरा आहे. ते त्यानुसारच काम करेल. जर आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील, तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल”, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

“झोपेतून जागे व्हा”; रश्मी ठाकरेंच्या भावावरील कारवाईवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया, भाजपावर साधला निशाणा!

“मला तर भीती वाटतेय, की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल, तर त्याच्यावरही ईडी कारवाई करेल”, असं देखील राऊत म्हणाले.

महागाईवरून केंद्रावर निशाणा

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी महागाईवरून केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला. “गरज सरो, वैद्य मरो असं केंद्राचं धोरण आहे. काल बऱ्याच दिवसांनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाईवरून गोंधळ झाला. निवडणुका संपल्या तशी महागाई वाढली. हीच भाजपाची चाल आहे. खेळ आहे. लोक फसतात. पण पूर्ण देशात महागाईविरोधात वातावरण तयार झालं आहे. देशात खरी समस्या काश्मीर फाईल्स, हिजाब, रशिया युक्रेन नसून महागाई आहे”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp on ed raid shridhar patankar cm uddhav thackeray rashmi pmw
First published on: 24-03-2022 at 11:59 IST