राज्यात शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचं सरकार स्थापन होऊन याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे एकनाथ शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीची चर्चा असताना दुसरीकडे कित्येक काही महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय अद्याप प्रलंबित असल्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे घटकपक्षांकडून यावर जाहीर भूमिका घेतल्या जात असताना ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केला आहे. तसेच, अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्यावरही त्यांनी टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपाचे महाराष्ट्रातील नेते कमजोर”

महाराष्ट्र भाजपातील सर्व नेते कमजोर पडल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. “आमची भूमिका स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करतेय. भाजपाला त्यांचं काम करू द्या. पण महाराष्ट्रातले भाजपाचे सगळे नेते कमजोर पडल्यामुळे दिल्लीतून वारंवार नेत्यांना इथे यावं लागतंय. चांगली गोष्ट आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचंच त्यांच्यासमोर आव्हान आहे हे स्पष्ट होतंय”, असं संजय राऊत म्हणाले.

“आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं की…”

दरम्यान, यावेळी शिवसेना एकनाथ शिंदेंनी नसून अमित शाह यांनी फोडली, असा दावा करताना संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे यांच्यावर ईडीच्या माध्यमातूनच दबाव आला. हे आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. त्यांच्यासमोर ते कसे रडले हे मलाही माहिती आहे. आमचं म्हणणं होतं की आपण खंबीर राहायला हवं. हेही दिवस जातील. पण हे लोक घाबरले. आता मोठ्या गर्जना करतायत. पण त्या पोकळ आहेत. भविष्यात भाजपा त्यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. ती सुरुवात झाली आहे. कारण त्यांना कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राचा आवाज उठवणारा पक्ष किंवा संघटना इथे नकोय”, असं राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी शिंदेपुत्राचे फाजील लाड केले, आता…”, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंना टोला!

महाराष्ट्रातील पाच मंत्र्यांचे राजीनामे?

दरम्यान, महाराष्ट्रातील पाच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासंदर्भात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचना केल्याची चर्चा रंगू लागली आहे. हे खरं असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “ही बातमी माझ्या माहितीप्रमाणे खरी आहे. त्यात चार मंत्री मिंधे गटाचे आहेत. त्यामुळे आता खरे स्फोट त्यानंतर व्हायला सुरुवात होईल.भविष्यात मीही इथे बसूनच ते स्फोट करेन”, असं संजय राऊत म्हणाले.

मला सुरक्षा नको – संजय राऊत

संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी आल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यावर ते म्हणाले, “सगळे धमकी देणारे लोक भाजपा पुरस्कृत आहेत. मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलंय की मी घाबरणारा नाही. मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams cm eknath shinde fraction bjp on cabinet expansion pmw
First published on: 10-06-2023 at 11:12 IST