एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले असताना दुसरीकडे आता छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणीही लावून धरली जात आहे. त्यामुळे आरक्षणावरून राज्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
“महाराष्ट्र खदखदतोय. हे चित्र देशासाठी चांगलं नाही. राज्यात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. महाराष्ट्र सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला. पुरोगामी महाराष्ट्र जातीपातींमध्ये विभागलेला दिसतोय”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. “आम्ही राष्ट्रपतींना सांगू की आरक्षणाची मर्यादा वाढवा. इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर अशा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात यावी”, असंही ते म्हणाले.




ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला
दरम्यान, ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्याची विनंती केली जाणार असल्याचं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
“मराठा समाजानं आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढतेय. त्यांना विरोध म्हणून ओबीसी, धनगर समाजाचे नेते पुढे आले आहेत. एकमेकांवर आरोप करत आहेत. घटनेनुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. राज्य सरकारला तो कोटा वाढवण्याचा अधिकार नाही. राष्ट्रपतींनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून त्यात ५० टक्क्यांहून जास्त आरक्षण देऊन निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे”, असं ते म्हणाले.
“मिंधे गट उद्या स्वत:ला अमेरिकेतला रिपब्लिकन…”, ठाकरे गटाचा टोला, ‘त्या’ घटनेवरून हल्लाबोल!
देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. “राज्याच्या गृहमंत्र्यांना या गोष्टीकडे पाहायला वेळ आहे का? सध्या ते छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान इथे कुठेतरी असू शकतात. राज्याच्या गृहमंत्र्यांनी सलग १५ दिवस महाराष्ट्रात थांबून मुंबईसह राज्याची कायदा-सुव्यवस्था व इतर प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त राजकीय विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्यापुरतं गृहमंत्रीपद नसून राज्यात सध्या घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ते आहे”, असं राऊत म्हणाले.
“मंत्रीमंडळात गँगवॉर हे माझं विधान सत्यच”
“आरक्षणाचा विषय गंभीर आहे. यावरून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातही गट पडलेत हे स्पष्ट आहे. मी मागेही म्हणालो की एकमेकांच्या अंगावर आलेत. मंत्रीमंडळात गँगवॉर आहे हे मी बोललो ते सत्य होतं. वरीष्ठ मंत्री यावर एकमेकांशी चर्चा करायला तयार नाहीत. मुख्यमंत्री, गृहमंत्री मूग गिळून गप्प आहेत. कुणाची काय भूमिका आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींना भेटत आहोत”, असं ते म्हणाले.