शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पाटलांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव टाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

संजय राऊत यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली की, तुम्ही स्वतःला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवताय तर मग बाळासहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्यासोबत मंत्रिमंडळात असतील, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसत असाल तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात. महाराष्ट्र तुम्हाला मिंधे म्हणत असेल तर त्यात महाराष्ट्राचं काय चुकलं. तुम्ही केवळ नाराजी कसली व्यक्त करताय? मुळात बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान असू नये.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री आणि त्यांची ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का? याप्रकरणी खुलासे चालणार नाहीत, आणि तुम्ही नाराजी कसली व्यक्त करताय, अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथा मारा. तेही जमत नसेल तर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका.

हे ही वाचा >> “अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत आणि …”, अंजली दमानियांच्या ट्वीटची जोरदार चर्चा

संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

दरम्यान, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे की, हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग लोकांना सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात. तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या.