देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी “सावरकरांनी महात्मा गांधींच्या सल्ल्यानेच माफीचा अर्ज केला”, असं वक्तव्य करून देशात नवीनच राजकीय चर्चा सुरू केली आहे. या मुद्द्यावरू तेव्हापासून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष असलेला काँग्रेस, शिवसेना आणि देशातील इतर पक्षांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सावरकरांबद्दल भूमिका मांडताना त्यांचा ‘माफीवीर’ असा उल्लेख करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सावरकरांनी माफी मागितली हे पूर्णपणे चुकीचे

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगातून सुटकेसाठी ब्रिटिशांची माफी मागितली, हे चुकीचे असल्याचं मत संजय राऊतांनी या सदरात मांडलं आहे. “गुलाम हिंदुस्थानचे नायक असलेले सावरकर स्वतंत्र हिंदुस्थानचे खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट होता. त्या कटाच्या कारवाया आजही सुरूच आहेत. सावरकरांनी माफी मागितली आणि सुटले असं म्हणणं संपूर्ण चुकीचं आहे. सावरकर शेवटपर्यंत ब्रिटिशांना खेळवत होते. हे ब्रिटिशांनीही ओळखलं होतं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

स्वातंत्र्यलढ्यापूर्वी परकीयांनी छळले आणि आज…

सावरकरांना परकीयांसोबतच स्वकीयांनी देखील त्रासच दिल्याची भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. “सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांना परकीयांनी छळले आणि आजही स्वकीय त्यांचा छळ करत आहेत. सावरकरांचं क्रांतिकार्य, त्यांचा त्याग विसरूल काही लोक त्यांना माफी मागून सुटलेला वीर म्हणत आहेत. हा एक कट आहे, सावरकरांच्या माफीबद्दलच्या दंतकथा अर्ध्याअधुऱ्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अंगावर एक चरोटाही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफिवीर म्हणून करत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

“..तर सावरकरांना पहिल्याच फटक्यात राष्ट्राध्यक्ष केलं असतं”

दरम्यान, संजय राऊत यांनी १९८० च्या दशकात घडलेला एक किस्सा नमूद केला आहे. “१९८० च्या सुमारास हिंदुस्थानातील काही मान्यवर फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले होते. एका फ्रेंच अधिकारी गप्पांच्या ओघात त्यांना म्हणाला, सावरकर फ्रान्समध्ये जन्माला आले असते आणि तुमच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे फ्रान्सने संघर्ष केला असता, तर सावरकरांना स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच फटक्यात देशाचे राष्ट्राध्यक्ष केले असते. सावरकरांविषयीचा हा आदर जगभरातल्या इतिहासकारांना आहे. त्यांनी सावरकरांचा त्याग, शौर्य आणि क्रांतिकार्य पाहिलं. ते माफीपत्राची चिटोरी चिवडत बसले नाहीत”, असं राऊत म्हणतात.

सावरकरांचे निवेदन माफीनामा आहे की राजकीय खेळी, हे…

“सावरकरांनी नाशिकला राहण्याची केलेली विनंती नाकारण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत राहू आणि राजकारणात भाग घेणार नाही, या दोन अटी तात्यांनी कबूल केल्यामुळे त्यांची सुटका सशर्त सुटका करण्यात येत असल्याचे माँटगोमेरी यांनी नारायणराव सावरकरांना पत्राने कळवले. आता हे निवेदन म्हणजे माफीनामा आहे की राजकीय खेळी, हे फक्त शहाण्यांनाच समजू शकेल”, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्ताचे सरकार त्यांना…

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून देखील संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. “सावरकर आणि त्यांच्या दोन्ही भावंडांनी सर्वस्व गमावले. अंदमानातून सुटल्यावर अखेरपर्यंत त्यांच्याजवळ चरितार्थाचं कोणतंच साधन नव्हतं. त्यांच्यासारखा विद्वान जगण्यासाठी परावलंबीच राहिला. स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना लोकांनी दिली. त्यांच्या विचारांचे सरकार आज सत्तेवर आहे ते त्यांना भारतरत्न द्यायलाही तयार नाही”, असं राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.