जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं असून त्यांनी आपल्याला गप्प राहायला सांगितल्यातं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावरून मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाले सत्यपाल मलिक?

‘वायर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये करण थापर यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे. “सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा”, असं सत्यपाल मलिक म्हणाले.

संजय राऊतांची आगपाखड!

संजय राऊतांनी या दाव्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. “हा मोठा गौप्यस्फोट नाही. ही गोष्ट देशाला आधीच माहिती होती की पुलवामा हल्ल्यात काहीतरी घोटाळा आहे. यात तेव्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे तेव्हाचे सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील असं म्हटलं जात होतं. आम्ही हे प्रश्न वारंवार विचारायचा प्रयत्न केला की पुलवामामध्य ३०० किलो आरडीएक्स पोहोचलं कसं? पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षा कर्मचारी प्रवास करत नाहीत. त्यांना विमान का दिलं गेलं नाही? की त्यांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती? पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणून गप्प करण्यात आलं”, असं संजय राऊत म्हणाले.

 “मी नरेंद्र मोदींना सांगितलं पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय, तर त्यांनी मला…”, जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचा खळबळजनक दावा!

“जबाबदार मंत्र्यांचं कोर्ट मार्शल व्हायला हवं”

“त्यांनीच नेमलेल्या राज्यपालांनी स्फोटक सत्य समोर आणलं आहे आणि ते पुलवामाच्या स्फोटापेक्षाही भयंकर आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. पण जे मंत्री जबाबदार आहेत, त्यांचं कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे”, अशी मागणी संजय राऊतांनी यावेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे सरकार नाही, गँग चालवतायत”

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयची नोटीस आल्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली. “अरविंद केजरीवालांना सीबीआयची नोटीस आली आहे. आता सीबीआय-ईडीचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसला तोडण्याचाही प्रयत्न आहे. तेजस्वी यादव यांनाही ईडी-सीबीआय बोलवत आहे. आमच्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांना लावलं आहे. हे सरकार आहे का? हे तर एक टोळी चालवत आहेत. गँग चालवत आहेत”, असं राऊत म्हणाले.