लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. टीकेची एकही संधी दोन्हीकडचे नेते सोडताना दिसत नाहीत. संजय राऊत यांनी आज श्रीकांत शिंदेंना बच्चा म्हटलं आहे. भाजपाने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीने आम्ही जास्तीत जास्ता जागा जिंकू असं म्हटलं आहे. अशात संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंना बच्चा म्हटलं आहे आणि त्यांच्यावर टीका केली आहे.

महाविकास आघाडीत तिढा नाही

महाविकास आघाडीत कुठलाही तिढा नाही. मुंबईतली एक जागा राहिली आहे त्याबद्दल आमची चर्चा सुरु आहे. काँग्रेसला ती जागा लढवायची नसेल तर आम्ही तिथे लढवू आणि जिंकून येऊ. जेव्हा आघाडी असते तेव्हा जागांची अदलाबदल होतेच. बऱ्याच गोष्टींवर चर्चा होते. इंडियन एक्स्प्रेसने काल जो अहवाल समोर आणला आहे ती गोष्ट नवी नाही. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये नेत्यांना टाकलं जातं आणि उजळले की पक्षात घेतलं जातं. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे. महाराष्ट्रात १२ लोक असे आहेत जे मोदींचे बारा वाजणार आहेत. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, अशोक चव्हाण हे तिघे असे नेते होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. २३ लोक असे होते ज्यांनी त्यांचा पक्ष सोडला आणि भाजपात गेले. त्यांच्यावरच्या केसेस थंड बस्त्यात गेल्या. भ्रष्टाचाराच्या टेकूवरच यांची सत्ता उभी आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

हे पण वाचा- भिवंडी लोकसभेचा तिढा सुटला! संजय राऊतांनी सांगितलं या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार

महाराष्ट्र लुटणाऱ्या मोदी, शाह यांच्यावर लोकांचा विश्वास नाही

महाराष्ट्र लुटणाऱ्या नरेंद्र मोदींवर, अमित शाह यांच्यावर देशाचा विश्वास नाही. उलट उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. भ्रष्टाचार म्हणून बोंबलायचं आणि त्यांनाच खांद्यावर घेऊन फिरायचं याला काय विश्वास म्हणायचा का? असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. कल्याण डोंबिवली आणि ठाण्याचा उमेदवार मुख्यमंत्री देऊ शकलेले नाहीत. तारणहार म्हणवायचं पण भाजपाच्या दहशतीखाली एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे ते अचानक अदृश्य होतात. आमचं लक्ष आहे सगळ्या घडामोडींवर असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

श्रीकांत शिंदेंवर बोचरी टीका

कल्याण मतदारसंघात पैशांची मस्ती असलेल्या उमेदवारांना वैशाली दरेकर ही एक सामान्य गृहिणी पराभूत करेल. कितीही बलदंड व्यक्ती असो मस्ती चालणार नाही. आम्ही नारायण राणेंचा पराभव केला होता हे सगळ्यांना माहीत आहे. श्रीकांत शिंदे बच्चा आहे. आधी हिंमत असेल तर कल्याण आणि ठाण्यातली उमेदवारी जाहीर करुन दाखवा असं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना दिलं आहे.