शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांच्या विवाहानिमित्त नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेला डान्स सध्या लक्षवेधी ठरत आहे. यावरुनच भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विखे पाटील म्हणाले, “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.