ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोबाईल मेसेजवर जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही धमकी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून आल्याचा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत असताना संजय राऊतांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. तसेच, आपण बोललो तर भूकंप होईल, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सूचक इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हा धमकीचा मेसेज आला आहे. “दिल्ली में मिल, तुझे एके ४७ से उडा दूंगा”, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच, लॉरेन्स बिष्णोई गँगचं नाव यात घेण्यात आल्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल केली आहे. “हिंदू विरोधी, मार डालूंगा तुझे. दिल्ली में मिल, एके ४७ से उडा दूंगा मूसेवाला टाईप. लॉरेन्स की ओरसे ये मेसेज है समझ ले”, असं या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे.

“धमक्या येत असतात”

दरम्यान, यासंदर्भात आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. “धमक्या येत असतात. पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचं सरकार गांभीर्यानं घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी लावल्यामुळे महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड

यावेळी बोलताना संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोंडसुख घेतलं. तसेच, अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्यात आलेल्या प्रकरणाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. “ठाण्यातल्या एका गुंड टोळीच्या म्होरक्यानं मला धमकी दिली होती. ज्यात मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचंही नाव आहे. पण ती तुम्ही गांभीर्यानं घेतली नाही. काल मला आलेली धमकी पोलिसांना कळवायचं काम मी केलं आहे. त्याचा मला राजकीय मुद्दा करायचा नाहीये. पोलीस यंत्रणा फक्त विरोधकांवर खोट्या कारवाया करण्यासाठी वापरली जातेय. असंच चालू राहू द्या, आम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विरोधकांना आलेल्या धमक्या…!”

“आम्हाला आलेल्या धमक्यांची माहिती जेव्हा आम्ही देतो, तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात. हा स्टंट आहे असं म्हणतात. मग तुमच्या घरात होतो तो स्टंट नाही का? तुम्ही त्यासाठी एसआयटी स्थापन करता. लोकांना पकडून घेऊन येता. तो तर सगळ्यात मोठा स्टंट आहे. खरं काय आहे, ते आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला मर्यादा राखायची आहे. तुम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी नाहीये. विरोधकही माणसंच आहेत. त्यांनाही कुटुंबं आहेत. तेही सामाजिक जीवनात वावरत असतात. पण लक्षात घ्या, सत्ता आज आहे, उद्या नाही. पारडं कधीही बदलू शकतं. मी जर खरं बोललो, तर भूकंप होईल”, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut targets devendra fadnavis on amruta blackmail case pmw
First published on: 01-04-2023 at 11:18 IST