शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर सहा सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर ‘पिक्चर अभी बाकी है’ असं लिहित संजय राऊतांनी बावनकुळेंना सूचक इशारा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी ‘एक्स’ अकाउंटवर चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो ट्वीट केला होता. ‘महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना?’ असं ट्वीटवर संजय राऊतांनी लिहिलं होतं. तसेच, माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. ते जर मी पोस्ट केले, भाजपाचे दुकान बंद होईल, असंही संजय राऊतांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : उलटा चष्मा : तो मी नव्हेच..

नवीन व्हिडीओत काय?

अशातच आज ( २४ नोव्हेंबर ) संजय राऊतांनी मकाऊमधील कॅसिनोतील सहा सेकंदाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात एक व्यक्ती कॅमेरा घेऊन चालत आहे. आजूबाजूला अनेक लोक खुर्चीवर बसलेली दिसत आहे. त्यामुळे व्हिडीओत काय आहे? हे अद्याप समोर आलं नाही. “मकाऊ की रातें… पिक्चर अभी बाकी है,” असं ट्वीटर कॅप्शनमध्ये संजय राऊतांनी लिहिलं आहे.

हेही वाचा : संजय राऊतांकडून कॅसिनोतील ‘तो’ फोटो ट्वीट, बावनकुळे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी मकाऊ येथे…”

बावनकुळे काय म्हणाले?

संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी बुधवारी ( २२ नोव्हेंबर ) भाष्य केलं होतं. “मागील ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. चारवेळा विधानसभेला निवडून आलो आहे. अशा फोटोंच्या आधारावर कुणाचीही प्रतिमा मलीन करता येत नाही, असं मला वाटतं. ३४ वर्षे काम करून आम्ही प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल, तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ,” अशा शब्दांत बावनकुळेंनी संजय राऊतांना सुनावलं होतं.