राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत हो ते सत्य असल्याचे म्हटले आहे. आता यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही यावर भाष्य केले आहे. ‘शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के नाही तर १०० टक्के अनुकूल होते’, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना आज (११ एप्रिल) केला.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या दाव्यावर संजय शिरसाट म्हणाले, “शरद पवार हे ५० टक्के नाही तर १०० टक्के तयार होते. पहाटेचा शपथविधी व्हायला शरद पवारच कारणीभूत होते. याबाबत अजित पवार यांनीदेखील अनेकदा सांगितले आहे. यासंदर्भात दिल्लीला ज्या बैठका झाल्या, त्याबाबतची माहिती मीडियाच्या माध्यमातून सर्वासमोर आलेली आहे. त्यांच्याच (राष्ट्रवादीच्या) नेत्यांनी सांगितले होते की, आमची बोलणी काय झाली होती? आम्ही कधी जाणार होतो? आम्हाला कोणते खाते मिळणार होते? यामध्ये शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेतल्यामुळे सुप्रिया सुळे, जंयत पाटील हेदेखील होते.

त्यांचीही मानसिकता तिकडे (भाजपाबरोबर) जाण्याची होती. पण उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून तुम्ही असे केले नाही तर आमच्यासाठी तिकडचे दरवाजे उघडे आहेत. अशा प्रकारची दमबाजी केल्याने आज ठाकरे गटाची अशी अवस्था झाली. शरद पवारांनी आपला डाव साध्य केला. महाराष्ट्रामध्ये आज विरोधी पक्षाचा नेता कोण? असा प्रश्न विचारला तर शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : “शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”

प्रफुल्ल पटेल नेमके काय म्हणाले होते?

“२ जुलै रोजी अजित पवार आणि आमच्या काही नेत्यांनी महायुती सरकामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५ आणि १६ जुलैला आम्ही मुंबईत शरद पवार यांना भेटलो. त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली होती. तुम्ही आमच्याबरोबर या. आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. त्यानंतर पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यामुळे यामधून असे दिसत होते की, ते (शरद पवार) भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.