Sanjay Shirsat : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारला लक्ष केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे दृष्कृत्य मान्य आहे का? राज्यभरात या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री नेमके कुठे होते? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच या विकृतीमध्ये जर मुख्यमंत्री शिंदेंना राजकारण वाटत असेल, तर तेही विकृत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती. या टीकेला आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
सरकार कसं चालतं, हे गेल्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेने बघितलं आहे. यादरम्यान अनेक आंदोलनं सरकारच्या अंगावर लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तरीही सरकारने आपली भूमिका ठामपणे मांडून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशावेळी आमचं सरकार घरात बसलेलं नव्हतं, सरकार रस्त्यावर होतं आणि याचीच पोटदुखी उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळेच त्यांनी असे बेछूट आरोप करणं सुरू केलं आहे, असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.
पूर्वीचे मुख्यमंत्री जनता तर दूर, कधी आमदारांना भेटत नव्हते. मात्र, आता मुख्यमंत्री हे रस्त्यावर उतरून काम करतात. जनता त्यांना सहज भेटू शकते. खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासात हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरणारे एकनाथ शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री असतील. हा एका दिवसाचा शो नाही, हे सरकार चालणारं सरकार आहे, घरात बसणार सरकार नाही. त्यामुळे दुसऱ्यांवर टीका करण्याआधी आपण काय दिवे लावले याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करायला हवा, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी संजय राऊतांच्या नादी लागून टीका करत बसू नये. आज महाराष्ट्रात शिवसैनिकाची सत्ता आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक आज राज्य चालवतोय त्याचं कौतुक सर्वत्र होतं आहे. एक शिवसैनिक राज्य चालवू शकतो, हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे. याचा उद्धव ठाकरेंना आनंद असायला हवा, मात्र, ते काँग्रेसच्या मांडीवर बसून टीका करत आहेत, अशी प्रतिक्रियाही संजय शिरसाट यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवरही भाष्य केलं. यंदा रक्षाबंधनाचा सण गावगावात साजरा झाला, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गावागावात पोहोचली आणि महिलांना आर्थिक मदत मिळाली. आज ग्रामीण भागातील महिलांना तुमचा भाऊ कोण? असं विचारलं तर मुख्यमंत्री आमचे भाऊ आहेत, असं महिला सांगतात. लोकांचा हा आनंद आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बघवला जात नाही. त्यामुळे त्यांना काही भागात दंगली उसळवायच्या आहेत. त्यासाठी २४ तारखेला त्यांनी महाराष्ट्र बंद घोषित केला आहे, हा बंद महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी आहे, अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याचा कोणतही कारण नाही, असे ते म्हणाले.