एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. शिंदे गटातील आमदार तसेच उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणारे आमदार एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांना बंडखोर, गद्दार म्हणत आहेत. असे असताना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली आहे. आम्हाला मर्यादा सोडून बोलायला लावू नका. आम्हाला गद्दार म्हणाल तर आम्ही आमच्या कार्यालयातील तुमचे फोटो काढून टाकू, असा इशारा शिरसाट यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> संजय राऊतांवरील कारवाईवर शरद पवारांचे मौन का? सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर, म्हणाल्या…

“आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे. या साहेबांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, त्यांना नमस्कार, असे म्हणून आमच्या कार्यालयात आम्ही बसू शकत नाही. तुमच्या विरोधात बोलण्याची आमची मानसिकता नाही. आम्हाला मर्यादा सोडून बोलायला लावू नका. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने आम्ही आमदार झालो आहोत. त्यांचा फोटो आमच्याकडून कधीच निघणार नाही. ते आमच्यासाठी दैवत आहेत आणि कायम राहतील. मात्र जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही कधीही ठेवणार नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. तसेच आम्ही विरोधात बोलावे, असे त्यांना वाटत असेल तर आम्ही निश्चित त्यांच्याविरोधात बोलू, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.

हेही वाचा >>> उद्यानाला ‘एकनाथ शिंदे’ नाव दिल्याने कार्यक्रम रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री पुण्यात पोहोचले, नगरसेवकाला म्हणाले “अरे बाबा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोमवारी (१ ऑगस्ट) कोल्हापुरात बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. आम्ही ज्यांना मोठं केलं, ज्यांना राजकीय ओळख दिली, त्यांनीच घात केला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. हे गद्दार आहेत. बेडकासारखी उडी मारून ते तिकडे गले आहेत, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच अजूनही कोणाला उद्धव ठाकरे यांच्याकडे परतावे असे वाटत असेल, तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण बंडखोरी केलेले आमदार हे गद्दार आहेत आणि भविष्यातही ते गद्दार म्हणूनच ओळखले जातील, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.