सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी बोगद्यापुढील अवघड वळणावर (एस कॉर्नर) झालेल्या अपघातात ब्रेक निकामी झालेल्या मालट्रकने पुढील वाहनाला जोरदार धडक दिली. नंतर बेंगरूटवाडीच्या कच्चा रस्त्यावर जाऊन ट्रक उलटला. काल (बुधवारी) रात्री क्षणार्धात घडलेल्या अपघाताच्या थराराने महामार्गावर वाहनचालकांत एकच खळबळ उडाली.

महामार्गावर सांगलीहून साखर भरून मुंबईला वाहतूक करणारा मालट्रक (एमएच१० सीआर ४१९७) जात होता. अवघड वळणावरील (एस कॉर्नर) तीव्र उतारावर मालट्रक खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे आला होता. मार्गावर बलकवडी कालव्याजवळ ट्रकचा एअर पाईप फुटल्याने ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालक लखन भिवा दुधाळ (खवे, ता. मंगळवेढा, सोलापूर) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक पुढे जाणाऱ्या मोटारीवर (एमएच १४ डीएन १५९६) तो जोरदार आदळला आणि महामार्ग सोडून पुढे जाऊन बेंगरूटवाडीच्या हद्दीत कच्च्या रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, मोटारीतील एक महिला गंभीर जखमी झाली व दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रकाश फरांदे, संजय पोळ, संजय जाधव व शिरवळ मदत पथक (रेस्क्यू टीम) तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद करण्याचे काम खंडाळा पोलीस ठाण्यात सुरू होते. या मार्गावर महामार्गावर सातारा कडून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्याच्या पुढे तीव्र उतार आणि अवघड वळण आहे. या वळणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. कित्येक गंभीर जखमी झाले. अनेक वाहनांचे व माल ट्रक मधील किमती मालाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

या मार्गावर नियमित अपघात होत असल्याने या मार्गावरची वाहतूक कित्येकदा बंद करावी लागते. वाहतूक घाट मार्गे सातारा कडे वळवली जाते. घाटातही अनेक माने गरम होऊन बंद पडण्याच्या घटना घडतात आणि घाटातही वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हे अवघड वळण काढून टाकावे अशी वाहनधारकांची मागणी होती. मात्र आता खंबाटकी येथे नव्याने दोन बोगदे तयार झाले आहेत. महामार्ग ला जोडणारा मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा मार्गही सुरु होणार असल्याने सातारहून पुण्याकडे येणारा जाणारा प्रवास सुखकर होणार आहे.