पूरग्रस्त व अतिवृष्टीमुळे भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या ५ हजार ७०३ कुटुंबातील २६ हजार १२८ व्यक्तींना सातारा जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

पुरबाधितांमध्ये वाई तालुक्यातील २९० कुटुंबांची संख्या असून एक हजार ५०३ व्यक्तींची संख्या आहे. कराड तालुक्यातील एक हजार ४११ कुटुंबातील सहा हजार १५५ पाटण तालुक्यातील दोन हजार ४२५ कुटुंबातील दहा हजार ३०७, महाबळेश्वर तालुक्यातील ७३ कुटुंबातील २६०, जावली तालुक्यातील एक हजार ७५० कुटुंबातील सात हजार ६९१ व सातारा तालुक्यातील ४४ कुटुंबातील २१२ व्यक्ती अशा एकूण पाच हजार ७०३ कुटुंबातील २६ हजार १२८ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरु करण्यात आले आहे. वाई तालुक्यातील जोर, येथील जाधव वस्ती, व भातुसे वस्ती येथील ग्रामस्थांना शासनाकडून प्राप्त गहू, तूर डाळ व आटा याचे वाटप आज करण्यात आले. तसेच जोर, खालची वस्ती आणि वरची वस्ती येथेही प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले तहसीलदार रणजित भोसले आदींनी शासनातर्फे प्राप्त धान्य वाटप करण्यात आले.

पुरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित कुटुंबांना शासन आदेशाप्रमाणे मंजूर केलेले धान्य वाटप करतांना कोणत्याही पात्र लाभार्थ्याला डावलले जाऊ नये यासाठी अत्यंत जबाबदारपणे वाटप करावे.तसेच या कामी तहसीलदार यांनी लक्ष ठेवावे अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
कराड तालुक्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पाटण तालुक्यात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जावली तालुक्यात आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाबळेश्वर तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.