सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२५.१९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. करपूर्व २३३.४८ कोटींचा ढोबळ नफा झाला असून, बँकेत ११ हजार ४६९ कोटी १३ लाख इतक्या ठेवी आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी दिली. बँकेची ७५ वी सर्वसाधारण सभा शनिवारी (१६ ऑगस्ट) बँकेच्या मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी दिली.

सातारा जिल्ह्याच्या सहकाराची प्रमुख बँक असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने कृषी व ग्रामीण क्षेत्रात वित्तपुरवठा करण्याच्या दृष्टीने मोठी कामगिरी बजावली आहे. या बँकेला नाबार्ड, महाराष्ट्र शासन राज्य बँक, महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक असोसिएशन, तसेच देशातील सहकारी संस्थांनी ११६ पुरस्कारांनी गौरवले आहे.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले, की या आर्थिक वर्षात बँकेला ढोबळ नफा २३३ कोटी ४८ लाख रुपये झाला आहे. सर्व तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा १२५ कोटी १९ लाख रुपये झाला आहे. बँकेबद्दल जनतेमध्ये असणारी विश्वासार्हता व पारदर्शक कार्यप्रणाली यामुळे बँकेच्या ठेवींत भरघोस वाढ झाली आहे. मार्च २०२५ मध्ये ११ हजार ४६९ कोटी १३ लाख इतक्या ठेवींची मजल गाठली आहे. बँकेची कर्जवसुली विक्रमी असून, निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के आहे.

बँकेची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहात शनिवारी (दि १६) दुपारी एक वाजता होणार आहे. मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.