सातारा : सातारा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती मंडपात आणण्यासाठीच्या ढोल ताशांच्या आगमनाने राजपथ दणाणून गेला. शहरातील महत्त्वाच्या मंडळांच्या उत्सव मूर्ती मोठ्या उत्साहात मंडपात आणल्या जात आहेत. तीन मंडळांच्या मूर्तींचे आगमन होत असल्याने मूर्तीपुढे झालेल्या ढोल ताशांच्या निनादामुळे राजपथ दणाणून निघाला होता. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सातारकर मंडळाचे कार्यकर्ते युवक सहभागी झाल्याने राजपथावर एकच गर्दी झाली होती.

गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची देखावे उभारण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे. या कामातच साताऱ्यात अनेक मंडळांची भव्य दिव्य देखावे आणि सजावटीसह मूर्ती स्थापित करण्याची परंपरा आहे.

या परंपरेनुसार यावेळीही या मंडळांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मंडप उभारणीनंतर सजावट, देखावे उभारणीच्या कामास वेग यावा, यासाठी गणेश चतुर्थीच्या अगोदरच मूर्ती मंडपात आणण्यात येतात. यानुसार तीन मंडळांनी आपल्या भव्यदिव्य गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपात नेण्यासाठीच्या आगमन सोहळ्याचे आयोजन केले होते. यानुसार राजवाडा बसस्थानक परिसरात सायंकाळपासूनच मूर्तीसह मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच सातारकरांची मोठी गर्दी झाली होती.

देवी चौक येथून एका मंडळाची, तर राजवाडा बसस्थानक परिसरातून दोन मंडळांच्या मूर्तीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी यावेळी हजारो सातारकरांनी गर्दी केली होती. या मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकासह शाहूपुरी अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिरवणुकीत ढोल ताशांसह ध्वनिवर्धकांमुळे संपूर्ण राजपथ दणाणून निघाला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील वीज वाहिन्यांची दुरुस्ती पालिकेसह वीज वितरण कंपनीने गतिमान केली आहे.