सातारा: जोर, बलकवडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात जोर गावाला जोडणारा ओढ्यावरील दगडी पूल पूर्णतः वाहून गेला आहे. परिणामी, जोरसह परिसरातील छोट्या मोठ्या वस्त्यांचा अन्य भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. नोकरी, व्यवसाय करणारे तसेच शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
या पुलावरून परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज नांदगणे येथील शाळेत जात असतात. ग्रामस्थ नोकरी, दूध, बाजारहाट, वैद्यकीय कामासाठी वाईला येत असतात. मात्र सध्या पूल आणि रस्ते तुटल्याने एस. टी. बससेवाही बंद झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. जोर पुलाबरोबर गोळेवाडी येथील जननी आई ओढा, रांजणवडा येथे बाजूचे कठडे तुटले आहेत. रस्त्यांवर जोर, गोळेवाडी, गोळेगाव या ठिकाणी रस्त्यावर दगड-माती आलेली आहे, दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या उद्भवत असून, प्रवासात अडथळे निर्माण होतात.
गोळेगाव येथे एका घराशेजारी एक दरड कोसळलेली आहे. त्यामुळे घराची मागील भिंत पडली आहे. पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात पडत आहे. सातत्याने वाहून जाणाऱ्या पुलामुळे त्याची काँक्रिटीकरणमध्ये उभारणी करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. पूल वाहून गेल्याने अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. तातडीने पूल दुरुस्त करून गावांचा संपर्क पूर्ववत करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
हा रस्ता धोम-बलकवडी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. हा तात्पुरता दुरुस्त केलेला पूल आहे. त्याला एका बाजूने तडा गेला आहे. पूर्वीपासून या भागात पाईप असलेल्या पुलांना मंजुरी आहे. येथील पुलांची दुरुस्ती प्रस्तावित होती. मात्र दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे पाईपचे पूल वाहून जातात. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पाईपच्या पुलांऐवजी दीर्घकालीन दळणवळणासाठी स्लॅबचे पूल उभारणीचा आग्रह धरला. त्यामुळे आता स्लॅबच्या पुलांला मंजुरी घेतली आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जलसंपदा विभागाकडून रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. पाऊस थांबताच मुख्य मार्गावरील पुलाचे काम सुरू होईल. – महेश गोंजारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, वाई