मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले लागोपाठ तीनदा निवडून आले असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले होते. मताधिक्य कमी झाल्याने त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर पोटनिवडणुकीला सामोरे जाताना उदयनराजे यांच्यापुढे मताधिक्य राखण्याचे आव्हान असेल.

आपल्या विरोधात कोणीही उमेदवार असला तरी आपण सहज विजयी होऊ अशा थाटात उदयनराजे वावरत असत. २००९ मध्ये २ लाख ९७ हजार, तर २०१४ मध्ये मोदी लाटेतही ३ लाख ६६ हजार मतांनी ते विजयी झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र उदयनराजे यांचे मताधिक्य कमालीचे घटले. मतांची संख्या वाढली असली तरी विरोधी उमेदवाराला मिळालेल्या मतांमुले उदयनराजे सावध झाले. तिसऱ्यांदा विजय मिळविला असला तरी उदयनराजे १ लाख ४४ हजार मतांनी विजयी झाले. २००९ आणि २०१४च्या तुलनेत उदयनराजे यांचे मताधिक्य चांगलेच घटले. गतनिवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य कमी झाले. एवढे मताधिक्य कमी होणे हा उदयनराजे यांच्यासाठी धोक्याचा इशाराच मानला जातो.

मताधिक्य घटल्याने उदयनराजे संतप्त झाले होते. दक्षिण कराड आणि पाटण या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये ते मागे पडले. ‘हा कसला विजय’, असे उद्विग्न उद्गार त्यांनी विजयानंतर काढले होते.

भाजपमध्ये प्रवेश करताना खासदारकीचा राजीनामा दिल्याने उदयनराजे यांना पोटनिवडणुकीला सामारे जावे लागणार आहे. त्यांच्याशी सामना करण्यासाठी राष्ट्रवादीने वेगळीच खेळी केली. पक्षाकडे तेवढा प्रभावी उमेदवार नसल्याने काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही जागा सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली. काँग्रेसनेही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. स्वत: उदयनराजे यांची लोकसभा पोटनिवडणूक लढण्याची तयारी नव्हती.

उदयनराजे यांच्यावर नाराज असलेला मोठा मतदारवर्ग आहे. त्याचा फायदा उठवून उदयनराजे यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करण्याची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची व्यूहरचना आहे.

घटता आलेख

२००९

२ लाख ९७ हजार

२०१४

३ लाख ६६ हजार

२०१९

१ लाख ४४ हजार