कराड : ‘माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धेत वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिकास असलेल्या मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक आणि एक कोटीचा पुरस्कार पटकावला. यावर ग्रामस्थांनी जल्लोष करून, एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने घेतलेल्या या स्पर्धेत मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून ‘हॅट्रिक’ साधली. पर्यावरणाच्या संगोपन आणि संवर्धनासाठी राज्य शासनातर्फे चार वर्षांपासून ‘माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा ग्रामीण आणि शहरी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते. पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंच तत्वावर या स्पर्धकांचे मूल्यांकन होते. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाची पाहणी करण्यात येते. सन २०२३-२४ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव परिसरामध्ये केलेले वृक्षारोपण, त्याचबरोबर जुन्या झाडांचे संगोपन, रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणीयदृष्ट्या प्रबोधन आणि जनजागृती अपारंपारिक ऊर्जा, बायोगॅस, सौरऊर्जा, त्याचबरोबर ई- व्हेईकल, ई- चार्जिंग सेंटर, कंपोस्ट खत, ओला कचरा, सुका कचरा यावर प्रक्रिया आदी बाबींवर मूल्यांकन केले जाते.

हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा आरोप, “४८ पैकी १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये व्होट जिहाद…”

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आतापर्यंत देशी प्रजातीच्या हजारो झाडांची लागवड केली. वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवल्याने जुन्या झाडांची संगोपन केले. अपारंपारिक ऊर्जा विकासमध्ये काम करताना महाराष्ट्रातले पहिले सौरग्राम म्हणून बहुमान मिळवला आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धेमध्ये मान्याचीवाडीने सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून एक कोटी रुपयांच्या पुरस्कारासह हॅट्रिकही साधली आहे.

हेही वाचा – गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या विरोधात श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने म्हणाले की, लोकसहभागातील कामाचे सातत्य आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळेच मान्याचीवाडी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होत आली आहे. गावातील महिलांचा मोठा सहभाग आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे स्पर्धेत राज्यस्तरावर पुन्हा यश मिळाले.