सातारा : स्वामी केवलानंद सरस्वती यांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा कार्यास गती दिली. त्यांनी अस्पृश्यांनाही वेद शिकण्याचा अधिकार असल्याची भूमिका घेऊन कर्त्या सुधारकाची भूमिका निभावली. त्यामुळे आजच्या काळातही त्यांचे पुरोगामित्व पथदर्शी ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान वाईच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पंडित टापरे अध्यक्षस्थानी होते.
दिवाण म्हणाले, की स्वामी केवलानंद यांनी तर्कतीर्थ, विनोबा भावे, परचुरेशास्त्री अशी कर्तृत्ववान शिष्यपरंपरा निर्माण करून राष्ट्रोन्नतीत मोठे योगदान दिले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यतानिर्मूलन चळवळीस मार्गदर्शन केले. तसेच क्रांतिकारकांनाही सहकार्य दिले. हिंदू धर्माचा गाढा अभ्यास असणाऱ्या केवलानंद यांनी स्वतःच्या नैतिक आचरणातून अखिल मानवतेचा संदेश दिला. हे त्यांचे मोठेपण आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. पंडित टापरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, प्राज्ञपाठशाळामंडळाचे अनिल जोशी, सतीश कुलकर्णी, शामराव कर्णे, नागेश मोने, डॉ. विक्रांत कांबळे, किसन वीर महाविद्यालयाचे डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. संग्राम थोरात, प्रतिष्ठानचे संचालक किशोर खरात, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे गणेश ससाणे, मोहन धायगुडे, एस. एस. चौधरी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निलेश गायकवाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरोजकुमार मिठारी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रवींद्र घोडराज यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रमोद भिसे यांनी केले, तर आभार सूर्यकांत आंबेकर यांनी मानले.
पुतळ्यांची भेट
तर्कतीर्थांचा ३१ वा स्मृतिदिन आणि शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या दोन्ही संस्थांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठानच्या वतीने तर्कतीर्थांचे अर्धपुतळे भेट देण्यात आले. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर येथील शिल्पकार अतुल डाके यांनी ही आकर्षक शिल्पनिर्मिती केली असून महाराष्ट्रातील तर्कतीर्थांची ही पहिलीच शिल्परचना आहे.