सातारा : साताऱ्यात जिल्हा परिषद शिक्षकांनी सोयीस्कर बदलीचा लाभ घेण्यासाठी अपंगत्व, घटस्फोटाची शक्कल लढविली आहे. तसेच काहींनी स्वतःला गंभीर आजारही प्रमाणपत्राच्या माध्यमातून दाखवला आहे. या सर्व प्रकाराच्या शिक्षक बदली संदर्भातील बोगस प्रमाणपत्राची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी गंभीर दखल घेत, या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
यासाठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांनी दिव्यंगत्व, दुर्धर आजारग्रस्तांची फेरतपासणी, घटस्फोटित व परित्यक्ता शिक्षकांची प्रत्यक्ष निवासी पत्त्यावर जाऊन शहानिशा करण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढला. यामधून अनेक शिक्षकांची फसवेगिरी उघडकीस आली आहे.
या पडताळणी अंतर्गत दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र घेणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या चौकशीत दोषी आढळल्याने शिक्षण विभागाने १६ जणांना नोटीस पाठविली आहे. संबंधितांकडून खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. जिल्ह्यातील ५८१ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची प्रकरणे आहेत.
सातारा जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक विभागाच्या २ हजार ६७० शाळा आहेत. गाव, खेडे आणि वस्तीपर्यंत शाळांचे जाळे निर्माण झालेले आहे. या शाळांवर ७ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. यामधील काही शिक्षकांनी तर कुटुंबातील व्यक्तींना आजार, दिव्यंगत्व दाखवल्याचे समोर आलेले आहे. म्हणजे सोयीसाठी या शिक्षकांनी आजार स्वतःला असल्याचे दाखवले आहे. आतापर्यंत ५८१ पैकी ७९ दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली.
त्याविषयी जिल्हा रुग्णालयाकडून प्राथमिक शिक्षण विभागालाही अहवाल सादर करण्यात आला. त्यातील १२ प्रमाणपत्रे अपात्र आढळली, तर चार शिक्षक गैरहजर राहिले. यामुळे प्रकरणातली बोगसगिरी उघडकीस आली आहे. उर्वरित ५०२ दिव्यंगत्वाच्या प्रमाणपत्रांमध्येही बोगस प्रमाणपत्रे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक आणि अडचणीसाठी सोईच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून दर वेळी शिक्षक अनेक क्लृप्त्या लढवत असतात. मात्र यामुळे अन्य शिक्षकांवर अन्याय होतो. त्यांना दुर्गम भागातच काम करावे लागते. हे लक्षात आल्याने शासनाने संवर्ग एक, दोन, तीन व चार अशी रचना तयार केली. संवर्ग एकमध्ये दिव्यांग, दुर्धर आजार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, कुमारिका व आजी-माजी सैनिकांच्या महिला शिक्षकांनाही सवलत दिली आहे. याचाच सूक्ष्म अभ्यास करून शिक्षकांनी सुगम भागात काम करण्याची संधी मिळावी म्हणून दिव्यांग, दुर्धर आजार अशी प्रमाणपत्रे काढली, तर महिला शिक्षकांनी घटस्फोट घेणे पसंत केले.
संवर्ग एकमध्ये समावेश झाल्याने शिक्षकांना सेवाज्येष्ठता मिळते. त्यांना आपल्या सोयीची म्हणजे सुगम भागातील शाळा मागता येते. त्यांना चांगल्या ठिकाणी काम करता येते. दुर्गम भागात काम करण्यापासून बचाव होतो. पती-पत्नी शिक्षक असतील, तर त्यांना ३० किलोमीटरमध्येच बदली मिळते. जेणेकरून कुटुंब एकत्र राहू शकेल. अशा बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी व शारीरिक फेरपडताळणी करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असल्याने अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.
१२ प्रमाणपत्रे अपात्र
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा आणि दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिव्यांगत्व प्रमाणपत्रे तपासली जात आहेत. पूर्वी दररोज १० प्रमाणपत्रांची पडताळणी होत होती; पण या विषयाचे गांभीर्य वाढत असल्याने दररोज २५ प्रमाणपत्रांची पडताळणी होत आहे.
या पथकाला ७९ प्रमाणपत्रे तपासल्यानंतर १२ अपात्र आढळली आहेत, तर चौघे जण तपासणीवेळी गैरहजर राहिले, त्यामुळे शिक्षण विभागाने यासाठी शिक्षकांना एकदमच नोटीस काढली आहे. ‘प्राथमिक शिक्षण’कडे आतापर्यंत ५८० शिक्षकांनी दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आलेले आहे. यातील ५८ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणीही सुरू झालेली आहे.
दिव्यांग प्रमाणपत्राबाबत १६ शिक्षकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात दिवसांत खुलासा मागविला आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास फौजदारीचा गुन्हा अथवा निलंबनाची कारवाई होऊ शकते. – अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, सातारा.