कराड : केंद्र सरकार जातनिहाय जनगणना कोणत्या संस्थेकडून करणार, त्यात कोणत्या जातींना समाविष्ट करणार? यासह विविध अधिवेशने बोलवणे गरजेचे असताना या एकूणच प्रक्रियेबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने ही जनगणना होईल की नाही? याबाबत शंका असल्याचे सांगत काँग्रेसच्या इतर मागास विभागाचे (ओबीसी सेल) प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली. कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माळी महासंघाचे राज्य अध्यक्ष संजय माळी, संजय तडाखे आदींची उपस्थिती होती.

दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने राज्य शासनाने या निवडणुका त्वरित घोषित करून त्या मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) घ्याव्यात, अशी मागणी भानुदास माळी यांनी केली.

केंद्रीय वित्त आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना सहा वर्षे निधी मिळालेला नाही. इतर मागास समाजातील घटकांसाठी विविध महामंडळे घोषित केली, परंतु कोणत्याही महामंडळासाठी स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली नाही. त्यामुळे इतर मागास घटकांची ही निव्वळ फसवणूक आहे. प्रत्येक जिल्ह्यात इतर मागास वर्गाच्या मुलांसाठी वसतिगृहे उभारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, ती फसवी ठरली आहे. मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी देशाची कर्नल सोफिया कुरेशी आणि सैनिकांबद्दल काढलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असतानाही सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही संकल्पना अत्यंत चुकीची असून, देशाच्या दृष्टीने ती धोकादायक आहे. याला आमचा विरोध आहे. देशाचे संविधान पूर्णपणे धोक्यात आल्याची टीका माळी यांनी केली.

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेशाचे इतर मागास वर्गाचे नेते म्हणून आम्ही स्वागत करतो. मात्र, मंत्रिमंडळात काँग्रेसमधीलच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. त्यातील अनेकजण भाजपसोबत गेलेत. सरकारमधील अनेक मंत्री, खासदार, आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही ते सत्तेत असल्याचीही टीका माळी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींच्या सत्काराचे आयोजन

राहुल गांधींच्या सातत्यपूर्ण मागणीमुळेच जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याने जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा सत्कार करून जातनिहाय जनगणनेच्या स्पष्टतेबाबत सरकारविरोधी आंदोलनास सुरुवात केली जाणार असल्याचा इशारा भानुदास माळी यांनी दिला.