उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तु संग्रहालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे खोदकाम करताना प्राचीन विटांचे बांधकाम सापडल्याने त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. उत्खनन केल्यानंतर या ठिकाणी सातवाहन काळातील गोलाकार विटांचे बांधकाम आढळले.
तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तु संग्रहालयास नवी इमारत बांधण्यासाठी १५ कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या इमारीतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु असताना १४ डिसेंबर रोजी प्राचीन विटांचे बांधकाम या ठिकाणी सापडले. त्यामुळे या ठिकाणाचे खोदकाम बंद करण्यात आले. या ठिकाणी १८ डिसेंबरला (बुधवार) संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यांनी उत्खखननास सुरुवात केली. ज्यानंतर या ठिकाणी प्राचीन सातवाहन काळातले अवशेष सापडले आहेत.
या विटा ४५ सेमी लांब, २४ सेमी रुंद आणि ८ ते सेमी जाड आहेत. याच उत्खननात सातवाहन काळातील मातीचा सुपारीसारखा मणी मिळून आला आहे. खाली काय असेल याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. संग्रहालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना प्राचीन विटांचे बांधकाम दिसून आले असून सदर बांधकाम उत्खननात सातवाहन काळातील असून पूर्ण उत्खनन झाल्यावरच नेमके काय आहे ते निश्चीत होईल असं अमोल गोटे यांनी स्पष्ट केलं.