राज्यभरात लाखोंच्या सभा गाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथे आयोजित जाहीर सभेवर सलग दुसऱ्यांदा पावसाने पाणी फेरण्याचा प्रयत्न केला. तथापि, वेगळ्याच वातावरणात झालेल्या या सभेत भरपावसात भाषण ऐकण्यासाठी जमलेल्यांना निराश न करता मोदींनी आपल्या शैलीत काँग्रेस आघाडीवर पुन्हा शरसंधान साधले. भाषणाची सुरुवात मराठीतून करत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीपासून महाराष्ट्राला वाचविण्याचे आवाहन केले. तसेच भाजपने कांदा निर्यातीवर कोणतेही र्निबध लादले नसून राष्ट्रवादी त्याबाबत अपप्रचार करत असल्याची तोफही त्यांनी डागली. यावेळी कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून गर्दीतून फलक दाखविण्यात आले. मोदींच्या भाषणावेळी पावसाने विश्रांती घेतली. परंतु, मैदानात बहुतांशी प्रमाणात चिखल असल्याने मोठय़ा प्रमाणावर जमलेल्या नागरिकांनी उभे राहून भाषण ऐकणे पसंत केले.
खरे तर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा दोन दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या रविवारी होणार होती. त्या सभेला काही तास बाकी असताना शहराला वादळी पावसाने झोडपून काढले. एकंदर स्थिती लक्षात घेऊन ऐनवेळी ही सभा रद्द करणे भाग पडले. पंतप्रधानांच्या सभेसाठी लगोलग मंगळवारची तारीख मुक्रर करण्यात आली. दरम्यानच्या काळात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभा मैदान पूर्ववत करण्यासाठी कंबर कसली. मंगळवारचा दिवस उजाडला तोच मुळी ढगाळ वातावरणात. सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. निसर्गाने साथ दिली तर सभा होईल असे सांगून निवेदक उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होते. हळुहळु नागरीकही जमा होऊ लागले. बसण्यासाठी ठेवलेल्या खुच्र्या डोईवर घेत अनेकांनी पावसापासून बचावाचा प्रयत्न केला. सभा होईल की नाही, याची प्रत्येकाला भ्रांत होती. नागपूरची सभा आटोपून मोदी थेट नाशिकच्या सभा मैदानावर पोहोचले. पावसात प्रतीक्षा करणाऱ्यांचे आभार मानून त्यांनी मराठीतुन भाषणाला सुरूवात केली. १५ वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीने सर्व क्षेत्रात लुटमार करत महाराष्ट्राला उध्वस्त केले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडे सत्ता दिल्यास तिसरी पिढी बरबाद होईल असा इशारा देत मतदारांनी जागे होऊन महाराष्ट्राला वाचवावे, असे आवाहन केले.
पंडित नेहरु जयंती ते इंदिरा गांधी जयंतीपर्यंत केंद्र सरकारमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता मार्गदर्शन शिबिरास सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सध्या काळ बदलला असून जग भुजबळांवर नाही तर बुध्दिबळावर चालते, असा टोलाही त्यांनी लगावला. कांद्याच्या घसरत्या दरावर त्यांनी भाष्य केले. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर कोणतेही र्निबध घातले नाहीत. राष्ट्रवादीकडून त्याबाबत अपप्रचार होत असून कृषी खाते शरद पवार यांच्याकडे असताना त्यांनी चारवेळा र्निबध लादल्याचे मोदी यांनी नमूद केले.