सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सने डंपरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. यामध्ये गुजरातमधील एकाच कुटुंबातील पाच पर्यटकांसह ट्रॅव्हल्सचा चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजते.

अपघाताची भीषणता इतकी होती की, डंपरची दोन्ही चाके तुटून रस्त्यावर पडली, तर टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. यामुळे ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मळगाव जोशी-मांजरेकरवाडी परिसरात ही घटना घडली.

जखमींची नावे:

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मयूर मालविय (वय ३५), समीक्षा मालविय (वय ३२), चंद्रिका मालविय (वय ३७), बन्सी मालविय (वय २१), हित मालवीय (वय १०) आणि किरीट मालविय (वय ४२) या गुजरात येथील पर्यटकांचा समावेश आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक विजयकुमार झापडी (वय ३५) हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताचे कारण:

गुजरात येथील मालवीय कुटुंब टेम्पो ट्रॅव्हलरमधून गोवा दर्शनासाठी जात होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास मळगाव परिसरात आल्यावर चालकाला अचानक डुलकी लागली. यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट समोरून जाणाऱ्या डंपरला मागून धडकली.

स्थानिकांकडून तातडीची मदत:

या अपघातानंतर तात्काळ मदतीसाठी धावलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले. संजय जोशी आणि सचिन मांजरेकर यांनी १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. रिक्षाचालक सुहास पेडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे सामान आपल्या रिक्षेतून रुग्णालयात पोहोचवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले ग्रामस्थ संजय जोशी, बाळा आरवंदेकर, सुनील नेमळेकर, दीपक जोशी, सचिन मांजरेकर, प्रणव मांजरेकर, गणेश जोशी आणि रिक्षाचालक सुहास पेडणेकर तसेच रुग्णालयात सेवा देणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना मोलाचे सहकार्य केले.