सावंतवाडी : सावंतवाडीजवळील ओटवणे येथील प्रसिद्ध संस्थानकालीन दसरोत्सवाला खंडेनवमीच्या मुहूर्तावर थाटात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या दिमाखदार दसरोत्सवाची सांगता गुरुवारी विजयादशमीला सायंकाळी उशिरा होणार आहे. वर्षातून एकदाच दर्शन घडणाऱ्या या देवस्थानच्या सुवर्ण अलंकारांसह सुवर्ण तरंगे पाहण्यासाठी जिल्ह्यासह गोवा आणि कोल्हापूर परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
ऐतिहासिक वैभव आणि राजेशाही परंपरा
गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानच्या सावंत भोसले घराण्याचे ओटवणेतील रवळनाथ हे कुलदैवत असून, सावंतवाडी संस्थानची न्याय देवता म्हणून या देवस्थानाला विशेष महत्त्व आहे. सुमारे साडेचारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या दसरोत्सवाच्या सुवर्ण पर्वणीला हजारो भाविकांनी रवळनाथ चरणी नतमस्तक होत कृपा आशीर्वाद घेतला. या राजेशाही उत्सवात भाविकांना राजसत्ता आणि वैभवाचा साज अगदी जवळून पाहता आला.
सुवर्ण अलंकारांनी सजले देवस्थान
या उत्सवासाठी सावंतवाडी कोषागारात असलेले या देवस्थानचे सुवर्ण अलंकार आणि तरंगाच्या मूर्ती मंगळवारी दुपारी रवळनाथ मंदिरात आणण्यात आल्या. त्यानंतर रवळनाथ-सातेरीसह या देवस्थानच्या सर्व देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले. सायंकाळी या देवस्थानच्या सातेरी, रवळनाथ आणि कुळाचा पूर्वस या तिन्ही तरंगाना सप्त पितांबरीच्या वस्त्रांनी सजविण्यात आले. दसरोत्सवात सर्व देवतांना भरजरी वस्त्रांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्याची प्रथा आहे. त्यामुळे या उत्सवात देवस्थानचे हे सुवर्ण वैभव डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.
पालखी मिरवणूक आणि ‘इंगळे न्हाणे’
सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर शिव लग्न सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी भाविकांनी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून लुटल्यानंतर हे सोने परस्परांना देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलांनी क्लेशपीडा परिहार्थ अग्नि स्नान (इंगळे न्हाणे) केले. यासाठी महिलांची मोठी गर्दी जमली होती. या सोनेरी दसरोत्सवासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व पोलिसांसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या खाजगी सुरक्षारक्षकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विजयादशमीला उत्सवाची सांगता
गुरुवारी सायंकाळी कुळाचा पूर्वस तरंग सवाद्य ओटवणे नदी संगम येथील ऐतिहासिक माठ्यातील सावंतवाडी संस्थानच्या पहिल्या खेम सावंत यांच्या समाधीला भेट देणार आहे. त्यानंतर भाविकांना देवतांचा आशीर्वाद आणि रवळनाथाचा गाव रखवाल कौल या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने दोन दिवसांच्या या ऐतिहासिक दसरोत्सवाची सांगता होणार आहे.