सांगली : महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनामध्ये स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याने कामातील कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व निश्चित करणे सोपे झाले असल्याचे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.आयुक्त गांधी यांनी सांगितले, स्काडा प्रणालीमुळे कमी मानवी हस्तक्षेप, स्वयंचलित प्रणाली असल्याने अयोग्य माहिती, वेळेचा अपव्यय आणि अकार्यक्षमता या बाबींवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.

तंत्रज्ञानाधारित प्रणाली शहरातील कचरा प्रक्रिया आणि वाहतुकीवर रिअल टाइम नियंत्रण व देखरेख ठेवण्यास मदत करणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या सेन्सर्स, कॅमेरेद्वारे माहिती गोळा करते व ती माहिती नियंत्रण कक्षात पाठवते. यामुळे व्यवस्थापन अधिक वेगाने व अचूकतेने निर्णय घेऊ शकते. ही अत्याधुनिक प्रणाली समडोळी रोड, सांगली आणि वड्डी बेडग रोड कचरा डेपो मिरज येथे सुरू करण्यात आली आहे.

उपआयुक्त स्मृती पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, स्कॉडा प्रणालीमुळे प्रत्येक कचरा संकलन केंद्रावर काय चालले आहे, वाहने वेळेवर पोहोचत आहेत का याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे डेपो पातळीवर रिअल-टाईम माहिती मिळू लागली आहे. वेळेत डाटा संकलन, कचरा संकलन व प्रक्रिया, लागलेला वेळ, इंधन वापर किती यावर दैनंदिन, साप्ताहिक, मासिक अहवाल उपलब्ध होत आहे.