जिप विरोधीपक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचा आरोप

पाणी साठवण टाकी, पाण्यासाठी पाईप लाईन आणि पाणी शुद्धीकरण टाकी या कामांसाठी भारत निर्माण योजनेतून तब्बल ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर, २०१५ मध्ये निविदा काढण्यात आली, २ वष्रे उलटून गेली तरी अद्याप या निविदेतील कोणतेच काम पूर्ण झाली नाहीत. असे असताना देखील कंत्राटदाराने ३ कोटी ४५ लाख रुपयांचे बिल काढले आणि जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने काम झाल्याची कोणतीच शहानिशा न करता बिल अदा देखील केले, असा आरोप रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी केला.

विरोधी पक्ष नेते उमटे धरणाची पाहणी करण्यास जात असल्याची खबर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाला सांगितल्याने विरोधी पक्षाच्या मागोमाग सत्ताधारी पक्षाचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांची देखील टीम उमटे धरणावर पोहोचली आणि उमटे धरणाबाबत दुरुस्तीची नेमकी काय स्थिती आहे. याची  पोलखोल झाली.

उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील सुमारे १५ ग्रामपंचायतींमधील सुमारे ७० गावांना पाणी पुरवठा केला जातो. सुमारे १ लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणाची धरण उभारल्यापासून आजची स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. या धरणातील डागडुजीबरोबरच या धरणात साठलेला गाळ ही चिंतेची बाब आहे. धरणाच्या डागडुजीचे प्रश्न समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत भारत निर्माण योजने अंतर्गत साडेपाच कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले. २०१५ मध्ये या कामाची निविदा जाहीर झाली आणि हे काम एका कंपनीला देण्यात आले. या कंपनीने उमटे धरणाच्या पाण्यासाठी साठवण टाकी, पाईप लाईन, पाणी शुद्धीकरण टाकी बांधण्याचे काम घेतले होते. निविदा जाहीर होऊन आता २ वष्रे उलटून गेली आहेत.

या कंपनीने काहीही काम न करता ३ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च दाखवीत ३ कोटी रुपयांची उचल केली आहे. ही उचल करताना १ कोटी रुपयांचे काम झाल्याचे सांगण्यात आले आहे प्रत्यक्षात मात्र काम झाले नाही आहे.  गेले अनेक वष्रे या धरणातून होणारा पाणीपुरवठा शुद्ध नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्याबाबतचे निवेदन स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले होते, मात्र  शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासना व्यतिरिक्त स्थानिकांच्या पदरी काहीच पडले नव्हते. असे असताना कंत्राटदाराने पाणी पुरवठा विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत अध्रे काम झाले असल्याचे दाखवून ३ कोटी रुपये काढले आणि संबंधित विभागाने ते बिल अदा केले आहे. यामुळे उमटे धरणाच्या कामात कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड होत आहे. अलिबाग तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.