​सावंतवाडी : जनता दलाच्या सौ. सीमा मठकर या आज गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार असून, त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.

​सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी सौ. सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल होणार आहे. तत्पूर्वी, माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

​महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढवण्यावर भर

​सावंतवाडी शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे श्री. राऊळ यांनी स्पष्ट केले. “तशा प्रकारचे प्रयत्न शेवटपर्यंत आमचे राहणार असून, पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आमच्याकडून सुरू आहे,” असे ते म्हणाले.

​शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, शब्बीर मणियार, समीरा खलील, आशिष सुभेदार, कृतिका कोरगावकर आदी उपस्थित होते.

​पक्षप्रवेश आणि उमेदवारी अर्जाचा कार्यक्रम

​श्री. राऊळ यांनी सांगितले की, सावंतवाडी न.प. निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ताकदीने उतरला आहे. महाविकास आघाडीसाठी चर्चा सुरू असून, लवकरच या संदर्भात निर्णय होण्याची आशा आहे.

​तथापि, आज ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, येथील श्रीराम वाचन मंदिर मध्ये सकाळी १० वाजता विनायक राऊत, अरुण दुधवडकर आणि वैभव नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

​कै. जयानंद मठकर यांचा वारसा

​सौ. मठकर यांचे सावंतवाडी शहराशी जुने नाते असून, त्यांना माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचा वारसा लाभला आहे, असे श्री. राऊळ यांनी नमूद केले. महाविकास आघाडीचे घटक पक्षही त्यांच्यासोबत राहतील.

​”सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि महाविकास आघाडीची साथ आहे, त्यामुळे प्रवेशाच्या रांगा लावायची आवश्यकता नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

​जागा वाटपात बंडखोरी होणार नाही

​कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या मागणीबाबत बोलताना श्री. राऊळ म्हणाले की, त्यांचा पक्ष त्यांच्या मागणीवर निर्णय घेईल. महाविकास आघाडीतून सीमा मठकर का हव्यात, यासाठीची चर्चा देखील झाली आहे.

​महाविकास आघाडी झाल्यास जागा वाटपावरून आमच्यात कोणतीही बंडखोरी होणार नाही. “आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही योग्य तो न्याय देऊ. इतर पक्षांप्रमाणे आमच्याकडे भांडणे नाहीत. एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाऊ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.